Mon, Jun 01, 2020 23:56
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › सातारा पालिकेत सभापतींचे खांदेपालट

सातारा पालिकेत सभापतींचे खांदेपालट

Last Updated: Jan 05 2020 1:28AM
सातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेत काही सभापतींचे खांदेपालट झाले. पाणीपुरवठा सभापतीपदी यशोधन नारकर, बांधकाम सभापतीपदी मिलिंद काकडे तर आरोग्य समिती सभापतीपदी अनिता घोरपडे यांची वर्णी लागली. मात्र, नियोजन सभापतीपदी ज्ञानेश्वर फरांदे, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी सुनीता पवार, उपसभापती संगीता आवळे यांना मुदतवाढीची लॉटरी लागली.

सातारा नगरपालिका सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केला होता. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी कमिटी हॉलमध्ये नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, स्मिता घोडके, राजू भोसले, प्रशांत आहेरराव तसेच आघाडीच्या नगरसेवक व पदाधिकार्‍यांची बैठक 10 वाजता पार पडली. त्यामध्ये सभापतीपदांची नावे निश्चित करुन विषय समिती सदस्यांच्या नावांवर चर्चा झाली. नगर विकास आघाडीची बैठक विरोधी पक्षनेते अशोक मोने यांच्या दालनात त्याचवेळी पार पडली. बैठकीस नगरसेवक अविनाश कदम,  शेखर मोरे, दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे आदि उपस्थित होते.  मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे सभापतीपदासाठी तसेच विषय समिती सदस्यासाठी इच्छुक  उमेदवारांच्या नावांची शिफारस आघाड्यांच्यावतीने करण्यात आली. भाजपच्या प्रतोद सिध्दी पवार, नगरसेवक मिलिंद काकडे, विकास गोसावी यांनीही मुख्याधिकार्‍यांकडे शिफारसपत्रे दाखल केली. त्यानंतर पिठासीन अधिकारी रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेत  रवी पवार यांनी सभापती निवडी तसेच विषय समित्यांबाबत माहिती दिली. त्यानंतर प्राप्त नामनिर्देशनपत्रे तसेच शिफारसपत्रांची छाननी करुन ती वैध असल्याचे जाहीर केले. आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण, महिला व बालकल्याण, नियोजन या विषय समित्या गठित  करुन त्या समितीमधील 13 सदस्यांची  तसेच सभापतींची नावेही जाहीर केली.  10 सदस्य असलेल्या स्थायी समितीमध्ये  सर्व सभापती हे सदस्य असतात. या समितीमध्ये तीन सदस्यांची निवड करण्यात आली. साविआकडून डी. जी. बनकर, सुजाता राजेमहाडिक तर नविआकडून दीपलक्ष्मी नाईक यांना संधी देण्यात आली. दरम्यान, नूतन पदाधिकार्‍यांचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

निशांत पाटील प्रतोदपदाच्या राजीनाम्याच्या तयारीत सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होवूनही कल्पना न दिल्याने साविआचे प्रतोद निशांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ‘माझा सर्वांनी मिळून खडसे केलाय,’ अशा शब्दांत त्यांनी सभापतीपद उमेदवारांचे अर्ज भरताना भावना व्यक्त केल्या. परिस्थिती पाहून चार-दोन महिन्यांतच प्रतोदपदाचा राजीनामा देणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

हादगे, पवार, खुटाळेंना याहीवेळी डावलले

गेल्या पंधरा दिवसांपासून सातारा विकास आघाडीत सभापतीपदावरुन रस्सीखेच निर्माण झाली होती. विद्यमान सभापतींकडून मुदतवाढीसाठी प्रयत्न सुरु होते. तर नव्यांकडून बदलासाठी मोर्चेबांधणी केली जात होती. शनिवारी झालेल्या सभापतीपदांच्या निवडीत फरांदे, पवार, आवळे यांना मुदतवाढ मिळाली.काहीजणांना पूर्वीही पदे देण्यात आली. मात्र, सीता हादगे, लता पवार, सुमती खुटाळेंना मात्र याही वेळी डावलण्यात आले. त्यांच्या चेहर्‍यावर ही नाराजी दिसून येत होती.

भाजपचे पहिल्यांदाच एकमत

भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार या प्रतोद झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेत साविआची एकहाती सत्ता असतानाही भाजपच्या वाट्याला एक सभापतीपद आले. विषय समित्यांवरही भाजप सदस्यांना संधी मिळाली. मात्र या निवडी करत असताना पक्षाच्या झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच इच्छुक सदस्यांच्या नावावर एकमत झाले. त्यावरुन पवार यांच्या संघटन कौशल्याची चुणूक दिसली.