Sat, Apr 20, 2019 10:39होमपेज › Satara › ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये सातारा पालिकेची पिछेहाट

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये सातारा पालिकेची पिछेहाट

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 10:23PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेने स्वच्छतेची संपूर्ण कामे साशा कंपनीला दिलेली असताना आणि आरोग्य विभागाचा स्टाफ ‘फूलफिल’ असतानाही ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ मध्ये पिछेहाट  झाली.  आरोग्य विभागापुरते मर्यादित ठेवलेले अभियान लोकचळवळ बनू शकले नाही. या अभियानात  पदाधिकारी आणि कर्मचारीच राबवले. तरीही सातारा नगरपालिकेला राज्यपातळीवर 11 व्या स्थानी तर देशपातळीवर 57 वे स्थान मिळाले. घनकचरा प्रकल्प तसेच मलनिस्सारण व्यवस्थापन नसल्याने त्याचा मोठा फटका बसल्याची चर्चा आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून देशपातळीवरील नगरपालिकांसाठी  ‘स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान 2018’ अभियान राबवण्यात आले. या सर्वेक्षणात  शहरांची रँकिंग, स्वच्छतेच्या 71 मानकांच्या आधारावर एकूण 4000 गुणांकरता विविध भारांसह घेण्यात आली. खुल्या शौचास (ओडीएफ) प्रक्रियेत 30%, सेवा स्तरावर प्रगती (पायाभूत सुविधा, प्रक्रिया, ऑपरेशन्स) 35%, घनकचरा गोळा 30%, घनकचर्‍याची प्रक्रिया व विल्हेवाट 25%, नागरिक प्रतिसाद 35%, माहिती, शिक्षण आणि संवाद 5%, स्वातंत्र्य क्षेत्र अवलोकन 30%, एकूण 100% च्या 5% क्षमतेची इमारत, नवीन उपक्रम 5% अशा पध्दतीने  एकूण 4000 गुण दिले  गेले.    गुण मिळवण्यासाठी सातारा नगरपालिकेकडून प्रयत्न राहिले. या योजनेचा प्रसार व्हावा, लोकांना त्याची माहिती व्हावी यासाठी नगरसेवकांसह  अधिकार्‍यांनी शासनाच्या स्वच्छता अ‍ॅपचा प्रसार केला. या  स्वच्छता अ‍ॅप्स’वर स्वच्छता समस्येसंदर्भातल छायाचित्र अपलोड होवू लागली. त्यानुसार कार्यवाही होवू लागली.  नागरिकांना या अभियानाची माहिती मिळावी यासाठी नगरपालिकेने शहरात ‘स्वच्छता अ‍ॅप’च्या माहितीचे फ्लेक्स लावले. अभियानाचे मुल्यांकन संबंधित यंत्रणांकडून झाले. अनेक दिवसांपासून या निकालाची उत्सुकता होती. या अभियानाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सातारा नगरपालिकेला राज्यात अकरावे स्थान मिळाले. नगरपालिका देशपातळीवर 57 व्या क्रमांकावर राहिली. यापूर्वी स्वच्छतेचे पुरस्कार घेणार्‍या सातारा नगरपालिकेची पिछेहाट झाली.  अभियानात पुरस्काराची रक्कम मोठी होती. यश न मिळाल्याने या मदतीला मुकावे लागले.  हे अभियान राबवत असताना आवश्यक असणारे प्रकल्प नगरपालिकेकडे नव्हते. अपुरी साधने यांच्यामुळेही मर्यादा आल्याचे सांगितले जाते. मात्र, या सार्‍या अडचणी पूर्वीही होत्याच. व्यापक अभियान राबवले जात असताना सर्वांना सोबत घेवून काम करणे गरजेचे होते. मात्र, हे स्वच्छता अभियान केवळ आरोग्य विभागाचे पदाधिकार्‍यांपुरते मर्यादित राहिले. त्यांनी रात्रंदिवस कामे केली मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही.