Mon, Aug 19, 2019 00:47होमपेज › Satara › पालिकेच्या जागेतील जुगार अड्डा उद्ध्वस्त

पालिकेच्या जागेतील जुगार अड्डा उद्ध्वस्त

Published On: Jul 22 2018 11:06PM | Last Updated: Jul 22 2018 10:50PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

नुतन पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने व त्यांच्या पोलिस सहकार्‍यांनी गुरुवार परजावरील जुगार अड्ड्यावर कारवाई करुन 1 लाख 65 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केलाच पण सातार्‍यातील जुगार धंदे समूळ नष्ट करण्यासाठी पत्र्याचे शेडच पोलिसांनी अक्षरश: उद्ध्वस्त केले. धक्‍कादायक बाब म्हणजे कारवाई केलेला जुगार अड्डा भरत असलेली जागा सातारा नगर पालिकेची असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शेडचा पत्रा उचकटून तोही जप्‍त केला आहे.दरम्यान, डीवायएसपी गजनान यांच्या या कारवाईच्या ‘श्रीगणेशाने’ भानगडबाजांची तंतरली आहे.

सातारा पोलिस उपविभागीय कार्यालयाचे पोलिस अधिकारी तथा डीवायएसपी गजानन राजमाने यांनी गेल्याच आठवड्यात चार्ज घेतला आहे. गेल्या पाच दिवसांत सातारा शहरासह जिल्ह्याची माहिती घेतल्यानंतर ‘नेटवर्क’ तयार करुन दोन दिवसांपासून त्यांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. सातार्‍यातील वाहतुकीला मोकळी जागा मिळावी यासाठी मुख्य ठिकाणांना भेटी देवून वाहतुकीच्या सूचना पोलिस कर्मचार्‍यांना दिल्या. यानंतर शुक्रवारी रात्रीपासून त्यांनी कारवाईचा धडाका करण्यास सुरुवात केली. गुरुवार परज येेथे जुगार अड्डा भरत असल्याची त्यांना माहिती मिळाली. डेप्युटी कार्यालयाच्या पथकासह सातारा शहर व शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलिस कर्मचारी सोबत घेवून त्यांनी स्वत: जुगार अड्ड्याला वेढा दिला.
गुरुवार परज येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची रेड पडल्यानंतर जुगार बहाद्दरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जुगार अड्ड्यालाच हेरल्याने सुमारे 12 जण त्याठिकाणी रंगेहाथ सापडले. पोलिसांनी रेड टाकलेला हा जुगार अड्डा कमालीचा प्रशस्त होता. पत्र्याचे भलेमोठे शेड टाकून दिवसभर जुगार अड्डा चालत होता. धक्‍कादायक बाब म्हणजे जुगारासाठी शेड टाकलेली जागा सातारा नगरपालिकेची आहे. 

डीवायएसपी गजानन राजमाने यांनी कारवाई केल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी रोख सुमारे 8 हजार रुपये, तसेच जुगार बहाद्दरांच्या दुचाकी व जुगाराचे साहित्य, मोबाईल असा सर्व मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. रात्री उशीरा ही कारवाई सुरु असल्याने परिसरात बघ्यांची गर्दीही उसळली होती. घटनास्थळावरील पंचनाम्याची प्रक्रिया झाल्यानंतर ती जागा नगरपालिकेची असल्याचे समोर आल्यानंतर डीवाएसपी गजानन राजमाने यांनी जुगाराचा हा अड्डा उद्ध्वस्त करण्याचे आदेश पोलिस कर्मचार्‍यांना दिले. पत्रा उचकटून आतील सर्व साहित्य काढण्याच्या सूचना आल्यानंतर कारवाईतील पोलिसही क्षणभर अवाक झाले मात्र अवघ्या दोन तासात जुगार अड्डा मोकळा करत तो उध्वस्त करुन पोलिसांनी मोहिम फत्ते केली.

डीवायएसपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अंकुश यादव, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, सुनील भोसले, धिरज कुंभार, दत्ता पवार,  प्रवीण पवार, केतन शिंदे, अरुण दगडे या पोलिस कर्मचार्‍यांनी कारवाईत सहभाग घेतला.