Mon, Jun 24, 2019 17:46होमपेज › Satara › सातारा : सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा (video)

महामार्ग ब्लॉक; ४ कि.मी.पर्यंत रांगा

Published On: Apr 28 2018 11:50AM | Last Updated: Apr 28 2018 11:50AMखेड/लिंब : वार्ताहर 

सलग चार दिवस शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्ट्या असल्याने फिरायला निघालेल्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असून त्याचा ताण वाहतुकीवर आला. शनिवारी सकाळपासूनच ठिकठिकाणी महामार्ग ब्लॉक होत गेला. जिल्ह्यातील आनेवाडी व तासवडे टोलनाक्यांवर चक्काजामच झाला. वाहनचालक व कर्मचार्‍यांची वादावादीही झाली. सातार्‍यासह अनेक ठिकाणी महामार्गावर वाहनांच्या तब्बल चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. भर उन्हातान्हात प्रवासी अडकून पडले. 

सलग सुट्ट्या, उन्हाळी हंगाम व लग्नसराई यामुळे वाहतुकीवर कमालीचा ताण आला आहे. जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे व प्रमुख धार्मिक ठिकाणी गर्दी झाली आहे. शनिवारी सकाळपासून महामार्गावर अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. सातारा शहरालगतच्या वाढे फाट्यावर मेगाब्लॉक झाल्याने वाहनांच्या सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या.

सध्या वाढे फाट्यावर उड्डान पुलाचे काम सुरू असल्याने अगोदरच मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी होत असताना शनिवारी त्यामध्ये आणखी भर पडली. ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे पोवई नाक्यावरून एस.टी. स्टँडकडे जाणार्‍या कोरेगाव, रहिमतपूर मार्गावरील एस.टी. बसेस वाढे फाटामार्गे वळवल्यानेही या चौकात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली. वाढे फाट्यापासून हॉटेल मानसपर्यंत तर कोल्हापूरवरून मुंबईकडे चाललेली वाहने वाढे फाट्यापासून चाहूर फाट्यावर उभी होती. 

वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालक व प्रवासी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले होते. त्यातच उन्हाचा चटका असल्याने अनेकांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली होती. सुमारे दीड तास वाहतूक कोंडीमुळे महामार्गाला मेगा ब्लॉकचे स्वरुप आले होते. त्यातच काही वाहनचालक मार्ग काढण्यासाठी वाहने पुढे रेटत असताना वादावादीचे प्रसंग घडत होते.

वाढे फाट्यावर सुरु असलेले उड्डाण पुलाचे धिम्यागतीने काम तर खेड चौकातून वाढे फाट्यापर्यंत अद्याप बंद असलेले उड्डाण पुलाचे काम यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून हा चौक दिवसेंदिवस धोक्याची सिमा ओलांडत चालला आहे. येथील वाहतूक कोंडीवर कामयस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.