Fri, Nov 16, 2018 04:57



होमपेज › Satara › शिवरायांना समजून घेण्याची छिंदमची पात्रता नाही : उदयनराजे

शिवरायांना समजून घेण्याची छिंदमची पात्रता नाही : उदयनराजे

Published On: Feb 18 2018 4:17PM | Last Updated: Feb 18 2018 4:17PM



सातारा  : प्रतिनिधी

कोणत्याही व्यक्तीने काही बोलण्यापूर्वी आपली वैचारिक उंची आणि पात्रता काय आहे आणि आपण कुणाबद्दल बोलतो याचा विचार आधी केला पाहिजे. श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करुन आपल्या कुप्रवृत्तीचे प्रदर्शन केले. छ.शिवाजी महाराजच नव्हे तर कोणत्याही महापुरुषावर कोणी उपटसुंभ टिका करतो त्यावेळी मनस्वी संताप येतो. अशा दुष्ट प्रवृत्तीचा आपण तीव्र निषेध करत असून, त्यांनी यापुढे छ.शिवाजी महाराजांसारखे महापुरुष समजून घ्यावेत, अशा भावनिक शब्दात खा. छ. उदयनराजे भोसले यांनी नगर महापालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

छ. शिवाजी महाराज यांच्यासारखा पुरुष जन्माला यायला संपूर्ण युगाचा कालावधी लागत असावा इतके मोठ कर्तृत्व युगपुरुष छ. शिवरायांचे आहे. सर्व जाती धर्माला समान न्याय देत युगपुरुष छ. शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. त्याकरिता त्यांनी असिम त्याग केला. राज्यकर्ता कसा असावा, जनतेप्रती त्याचे उत्तरदायित्व काय असावे, वंचितांना मुख्य प्रवाहात कसे आणावे, शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याने त्याच्याबाबतीत कोणती राजनिती असावी, न्यायदान कसे असावे, शेतजमिनींवर आकारण्यात येणारा शेतसारा कसा आकारावा, त्याचे मापदंड काय असावेत, महिला भगिनींविषयी राज्यकर्त्यांचे काय धोरण असावे, युध्दनिती कशी असावी, गनिमी कावा केव्हा राबवावा, इ. अनेक रोजच्या जीवनातील प्रश्नांवर युगपुरुष छ. शिवरायांनी ठरवून दिलेली शिवनीती संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ ठरली आहे. युगपुरुष छ. शिवरायांविषयी काही बोलण्यापूर्वी छ. शिवराय आधी समजून घ्यावे लागतील. श्रीपाद छिंदमसारख्या उचलली जीभ लावली टाळ्याला अशा नितीमत्तेच्या व्यक्तींना छ. शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी कदाचित अनेक जन्म घ्यावे लागतील, असेही खा. छ. उदयनराजे म्हणाले.

ज्यांची क्षमता आणि पात्रता नाही अशा व्यक्ती काही बोलतात त्यांच्या या प्रवृत्तीचा आपण निषेध करत असून, त्यांना छ. शिवाजी महाराज समजून घेण्याची सुबुध्दी मिळो, अशा शब्दात श्रीपाद छिंदम यांना खा. उदयनराजेंनी फटकारले.

दरम्यान शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांनी संयम राखून मोठया दिमाखात शिवजयंती महोत्सव साजरा करावा, शिवजयंती उत्सवास कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शिवप्रेमींनी कार्यरत रहावे, असे आवाहन खा. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.