Sat, Apr 20, 2019 07:59होमपेज › Satara › ब्लॉग : राजे, सावध मारताय ना ‘कमळी’ला डोळा?

ब्लॉग : राजे, सावध मारताय ना ‘कमळी’ला डोळा?

Published On: Feb 28 2018 12:54AM | Last Updated: Feb 28 2018 12:54AMसातारा : हरिष पाटणे

वधूपिता मांडवात असताना स्वत:च्याच सोहळ्यात मुंडावळ्या डोक्यावर घेवून ‘शेजारच्या कमळी’ला डोळा मारणे म्हणजे मोठे धारिष्ट्याचे काम! अशी कामे करायला जाणारे भले भले मधल्या मधे पेकाटतात, गारठतात, कधी कधी केकाटत मांडवातून पळही काढतात. सातार्‍याच्या बदलत्या राजकारणाचा धांडोळा घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात असे धारिष्ट्य एकाच पठ्ठ्याने करुन दाखवले. ज्या पक्षाचे गेली आठ वर्षे उदयनराजे खासदार आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या वाढदिवसाच्या सोहळ्याला बोलावून उदयनराजेंनी राष्ट्रवादीवर बोळा फिरवत शेजारच्या कमळीलाच एकप्रकारे डोळा मारण्याचे धारिष्ट्य दाखवले! उदयनराजेंच्या या कृतीचे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अर्थ निघणार आहेत.  तिसर्‍यांदा लोकसभेच्या मांडवावर चढू पाहणारे उदयनराजे तितकेसे सावध आहेत का?  बदफैली फितुरांच्या टोळ्या आसपास फिरत असताना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणारी सज्जता उदयनराजेंनी केली आहे का? स्वकीय आणि विरोधकांमधील अनेकजण घात करण्यासाठी टपून बसले असताना राजे खरोखरच बेफिकीर नाहीत ना?

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यालाही गटबाजीचे दोन बुरुज आहेत. एक थोरल्या पवारांचा व दुसरा धाकट्या पवारांचा. शरद पवार यांनी नेहमीच बालेकिल्ला आपल्या ताब्यात ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. उदयनराजे अजित पवारांच्या सैन्यावर कितीही तुटून पडले तरी शरद पवारांनी कधी ‘कासरा’ ओढला नाही. उदयनराजेंना पहिल्यांदा तिकीट देतानाच ‘हा खोंड तासाला धरुन चालल्याशिवाय राहणार नाही,’ असे पवार म्हणाले होते. मात्र, खोंडाने  तास कधीच बघितला नाही. शिवाळ खांद्यावर घेवून खोंडाने राष्ट्रवादीचे वावर उभे-आडवे, वाकडे-तिकडे कसेही नांगरुन टाकले होते. तेव्हा वावराच्या मालकाने कधीच आक्षेप घेतला नाही आणि ढेकळं वेचायला येणार्‍यांनीही खोंडाला कधी वेसन घालायचे धाडस दाखवले नाही. या सगळ्यांनी हे धाडस आताच का दाखवावे? घटस्फोटाचा मुहूर्त आताच का काढावा? उदयनराजेंच्या विरोधात बहिष्काराचा कार्यक्रम आखून एकप्रकारे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी व आमदारांनी शरद पवारांच्या निर्णयालाच आव्हान दिले आहे असे आम्ही मानायचे नाही का? पक्षाच्या खासदाराच्या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष उपस्थित राहतात आणि पक्षाचे आमदार व पदाधिकारी पक्षाध्यक्ष व्यासपीठावर असतानाही तिकडे फिरकत नाहीत याला राष्ट्रवादीतील अंतर्गत बंड म्हणायचे नाही का?  अजित पवारांचे व उदयनराजेंचे कधीच पटले नाही हा पूर्व इतिहास पाहता सातारा जिल्ह्याच्या पक्षसंघटनेत  अजित पवारांची सरशी झाली असे म्हणायचे नाही का?  दुसर्‍या बाजूने विचार केला तर शरद पवारांच्या निर्णयाला आव्हान देण्याइतपत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मोठे आहेत का? मुख्यमंत्र्यांनी सातार्‍यात राष्ट्रवादीच्या खासदाराच्या कार्यक्रमाला येणे, उदयनराजेंचे जाहीर कौतुक करणे, मुक्त विद्यापीठ म्हणून शरद पवारांच्याच समोर तेवढ्याच मुक्तकंठाने उदयनराजेंची स्तुती करुन ‘वाट्टेल ते देतो’ हे सांगून जाणे म्हणजे राष्ट्रवादीच्या भात्यातला बाण काढून घेण्याचीच ती खेळी नव्हती का? त्यात लगतच्या मतदारसंघातील चार विधानसभांची गोळाबेरीजही लपलेली दिसत नाही का? अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत शरद पवारांच्या झालेल्या सावध व सपाक भाषणाचा अर्थ काय घ्यावा? नागरी सत्काराचा हार मुख्यमंत्री, उदयनराजे व भाजपच्या मंत्र्यांसह शरद पवारांच्या गळ्यात अडकवला जात असताना हा हार पध्दतशीरपणे स्वत:च्या गळ्यात अडकवून न घेण्यामागे शरद पवारांची नेमकी मानसिकता काय होती?  ‘लोकसभेला उदयनराजे आम्हाला चालणार नाहीत. कोणताही दगड द्या निवडून आणू’, हे आमदारांच्या बैठकीतील वाक्य पवारांना त्यावेळी आठवले की काय?  बहिष्काराच्या बैठकीतून आपल्या कार्यकर्त्यांची नाराजी घालवत त्यांची समजूत काढत सगळ्यांना हाकारुन व्यासपीठावर आणण्याइतपत पवारांची पक्की मांड पक्षावर असताना पवारांनी ‘चला उदयनराजे, आपण पुढे निघू,’ असा पवित्रा का घ्यावा? त्यादिवशी नेमके शरद पवार हरले होते की अजित पवार जिंकले होते? मग या सगळ्यांचा अर्थ शरद पवारांचे नाव घेताना भावनिक झालेल्या  उदयनराजेंनी सावधपणे घेतला आहे का? 

वाचा : जीवात जीव असेल तोपर्यंत तुमच्यासोबत 

आपला ‘कार्यक्रम’ करण्यासाठी राष्ट्रवादीतील राघूंचा थवा टपून बसला आहे, याची भणक उदयनराजेंना नव्हती असा कुणाचा समज आहे का? मोक्याच्या क्षणी राष्ट्रवादीला अनेकदा ‘मोक्का’ लावणार्‍या उदयनराजेंना ही सगळी मंडळी आपल्या सोहळ्याला येणार नाहीत हे माहित नव्हते, अशी कुणाची समजूत आहे का?  गेली आठ वर्षे पक्षातील ‘घड्याळबाबां’शी पंगा घेणार्‍या उदयनराजेंनी कोण किती पाण्यात याचा कधीच अदमास घेतला होता. त्यामुळेच धमाका उडवून द्यायचाच हे त्यांनी पक्के ठरवले होते. त्यासाठी ‘धारकर्‍यांची’, वारकर्‍यांची फौजच्या फौज पाचारण करण्यात आली होती. मात्र, या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्याचा करिष्मा उदयनराजेंच्या समर्थकांनी व त्यांच्या सो कॉल्ड टिमने राखून ठेवला आहे का? एक लढाई जिंकल्यानंतर त्याच वातावरणात मश्गूल राहण्याचा उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचा शिरस्ता आहे. वानगीदाखल सातारा पालिकेच्या निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उदाहरण कोण लक्षात घेईल का? 
 जिल्हा परिषदेच्या मैदानावर यापूर्वी दस्तुरखुद्द शरद पवारांचा सत्कार सोहळा झाला होता. या सोहळ्याला जेवढी गर्दी होती त्यापेक्षा जास्त गर्दी जमवून उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आणला आहे हे जरी खरे मानले तरी केवळ गर्दीवर मतांची गणिते मांडता येत नाहीत हे उदयनराजेंना कुणी सांगायला नको. शरद पवारांच्या सभेला आलेला माणूस अन् माणूस कार्यकर्ता होता, त्याचा निवडणुकीच्या बुथशी संबंध होता, कुठल्या ना कुठल्या संस्थेचा तो पदाधिकारी होता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो मतदार होता. तेव्हा वाढदिवसाच्या सोहळ्याला जमलेल्या गर्दीचे मतांशी नाते जोडून उदयनराजेंच्या समर्थकांनी  बेभान व बेसावध राहण्यात काहीच अर्थ नाही. उलट सत्कार सोहळ्याला आलेला प्रत्येक कार्यकर्ता गावागावातील बुथचा एजंट करुन ही गर्दी मतात परिवर्तीत करण्यासाठीचे आडाखे आखावे लागतील.

उदयनराजेंशी थेट पंगा घेण्याचा निर्णय घेवून राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मोठे धाडस केले आहे. राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराचा स्वत:च्या मतदारसंघात बोलबाला आहे. प्रत्येकाची स्वत:ची व्होटबँक आहे. उदयनराजेंना अंगावर घ्यायचेच असे त्यांनी पक्के ठरवून ठेवले आहे. त्यामुळे ‘कमळा’बाईला जवळ करताना उदयनराजेंनाही दहादा विचार करावा लागणार आहे. सत्कार सोहळ्यात  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ‘तुम्ही कराडचेही खासदार आहात,’ असे सहज बोलून गेले. त्यांच्या बोलण्यातला गर्भितार्थ व सद्यस्थितीत कराडमध्ये उफाळून आलेला स्वाभिमान याकडे उदयनराजेंना व त्यांच्या समर्थकांना दुर्लक्षून चालणार आहे का? उदयनराजेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार म्हणजे भविष्यात उदयनराजेंना तिकीट देण्यास नकार, हीच राष्ट्रवादीची सध्याची भूमिका दिसते. ते खरे मानले तर काँग्रेसलाही राष्ट्रवादीसोबत जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत उदयनराजेंची पर्यायी यंत्रणा तयार आहे का? राष्ट्रवादीचे गावागावात बुथ एजंट आहेत. भाजपशी सोयरिक करायची असेल तर या पक्षाचे गावागावात केडर आहे का? याकडेही पहायला नको का? 
जशी उदयनराजेंना धोक्याची घंटा आहे तशाच धोक्याच्या घंटेचा राष्ट्रवादीच्या डेअरिंगबाज नेत्यांनी विचार केला आहे का? उदयनराजेंचे उपद्रवमूल्य राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहित नाही का? लगतच्या सगळ्याच मतदारसंघांवर उदयनराजेंचा प्रभाव पडू शकतो. सातार्‍यात दीपक पवार, कोरेगावात महेश शिंदे अथवा रवी साळुंखे, वाईत मदनदादा भोसले किंवा उदयनराजेंचाच एखादा लाडका समर्थक, कराड उत्तरेत मनोज घोरपडे, कराड दक्षिणेत डॉ. अतुलबाबा भोसले, पाटणमध्ये शंभूराज देसाई यांना बरोबर घेवून ताकद देवून, राज्यात सध्या असलेल्या सत्तेचा निवडणूकपूर्व काळात पूरेपूर वापर करुन घेवून उदयनराजे बाजी पालटून दाखवू शकतात याचाही विचार अनेक वर्षे सलगपणे निवडून येत असलेल्यांनी व जनतेला गृहित धरणार्‍यांनी केला आहे का?  एकवेळ उदयनराजे स्वत:चा उमेदवार निवडून आणण्यात अपयशी ठरतील पण राष्ट्रवादीचा उमेदवार ते पाडू शकतात आणि पाडायला मते तरी किती लागतात? याचाही विचार राष्ट्रवादीला करावा लागणार आहे. 

कमळीला डोळा मारताना आपण राष्ट्रवादीवर बोळा फिरवला आहे.  आपल्या या भानगडीमुळे आपणच लोळागोळा होणार नाही ना याचा जसा विचार उदयनराजेंना करावा लागणार आहे तसाच जमवलेल्या गर्दीमुळे पोटात उठलेला गोळा राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाला कायमचा टाळा लावायला भाग पाडणार नाही ना याचीही चिंता राष्ट्रवादीला करावी लागेल. तुर्तास बाजी उदयनराजेंच्या हातात आहे तेव्हा राजे घात होणार नाही यासाठी सावध असा!