Sat, Jun 06, 2020 01:33होमपेज › Satara › पोटनिवडणूक लांबल्याने उदयनराजेंना धक्का 

पोटनिवडणूक लांबल्याने उदयनराजेंना धक्का 

Published On: Sep 22 2019 1:35AM | Last Updated: Sep 22 2019 1:35AM
सातारा : प्रतिनिधी

विधानसभेबरोबर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागेल अशी मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केलेली खात्री खोटी ठरली असून त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देवून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना धक्का बसला आहे. सातार्‍याची पोटनिवडणूक  लांबणीवर पडल्याने तुर्तास उदयनराजेंना भाजपच्या विधानसभेच्या उमेदवारांचा स्टार प्रचारक म्हणून काम करावे लागणार आहे. विधानसभा प्रचारावेळी त्यांची लिटमस टेस्ट होणार असून निकालानंतर बुथ प्रमुख अहवाल सादर करतील. त्यानंतरच लोकसभा पोटनिवडणुकीची व्यूहरचना भाजपकडून केली जाईल.

भाजपमध्ये प्रवेश करताना विधानसभेबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक व्हावी अशी अट उदयनराजेंकडून घालण्यात आली होती. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सातार्‍यात जाहीर सभेत विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणूक होईल असे सांगितले होते. कराड  येथील पत्रकार परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी तसेच सुतोवाच केले होते. प्रत्यक्षात मात्र शनिवारी निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या.  त्यात सातार्‍याच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा उल्लेख नाही. मुळातच पोटनिवडणूक होण्यासाठी जो कालावधी लागतो तो कालावधी बसत नव्हता. त्यामुळे पोट निवडणूक लागण्याची शक्यता धुसर आहे हे ‘पुढारी’ने आधीच प्रसिद्ध केले होते. घडलेही तसेच.

पोटनिवडणूक जाहीर झाली नाही त्यामुळे उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर  ‘भाजपचा उदयनराजेंना ठेंगा’ अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले. भाजपने राजेंना फसवल्याचे मेसेजही त्यात होते. 

विधानसभेबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक झाली असती तर विधानसभेच्या उमेदवारांबरोबर प्रचार करणे उदयनराजेंना सोयीचे गेले असते. क्रॉस व्होटिंगचा धोका नव्हता. प्रचार आणि सभा एकत्रित घेणे सोयीचे ठरले असते.  या सर्व शक्यता गृहित धरूनच उदयनराजेंना लोकसभेबरोबर निवडणूक हवी होती असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, आता ही निवडणूक लांबणीवर पडल्याने उदयनराजेंना विधानसभेच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे.  यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ‘याला डोळा मार, त्याला डोळा मार’ हे खपवून जायचे.

भाजपमध्ये मात्र विधानसभेला उदयनराजेंनी सर्व मतदार संघांमध्ये किती मताधिक्य दिले याचा हिशेब बुथ प्रमुख, शक्‍ती केंद्र प्रमुख देणार आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षांमधील मित्र प्रेमालाही फाटा द्यावा लागेल आणि भाजपच्या उमेदवारांसाठी काम करावे  लागणार आहे. .

विधानसभेच्या निवडणुकीनंतर  लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याने भाजपचे उमेदवारही आपल्याला किती मदत झाली यावर उदयनराजेंचे काम करतील. एकप्रकारे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळाने उदयनराजेंची परीक्षाच घेतली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विधानसभेनंतर येणारी लोकसभेची पोटनिवडणूक उदयनराजेंना तशी सोपी नाही.