Tue, Jul 23, 2019 10:51होमपेज › Satara › थापा मारायलाही अक्कल लागत नाही : शिवेंद्रराजे

थापा मारायलाही अक्कल लागत नाही : शिवेंद्रराजे

Published On: Apr 24 2018 10:30PM | Last Updated: Apr 24 2018 10:30PMसातारा : प्रतिनिधी

जनतेने निवडून दिलेल्या प्रत्येक लोक-प्रतिनिधीला पाच वर्षे काम करण्याची संधी मिळते. सातार्‍यातील काही लोकप्रतिनिधींची तर्‍हा मात्र निराळीच असते. निवडून आले की, चार वर्षे अज्ञातवासात राहणार आणि पुन्हा निवडणूक तोंडावर आली की, हातात नारळ घेऊन गल्लोगल्ली फिरणार आणि ‘काम दुसर्‍याचं; पण मी केलं, मी केलं,’ अशी घोकमपट्टी  करणार. टीका करायला फारशी अक्कल लागत नाही, त्याचप्रमाणे थापा मारायलाही फारशी अक्कल लागत नाही, हे सातार्‍यातीलच काही लोकप्रतिनिधींमुळे खरे ठरले आहे, अशी टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. शिवेंद्रराजे यांच्यावर सोमवारी सातार्‍यात झालेल्या टीकेनंतर त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून प्रत्युत्तर दिले आहे. 

40 वर्षे आमच्याकडे सत्ता होती. सत्ता सातारच्या जनतेने आम्हाला दिली आणि तुम्हाला का घरी बसवले होते, याचेही आत्मपरीक्षण करा, असे आवाहन करून आ. शिवेंद्रराजे यांनी पुढे म्हटले आहे की, शेवटी सत्तेत येण्यासाठी     कोणाच्या मदतीचा हात हातात घ्यावा लागला हेही पहा. 40 वर्षात भाऊसाहेब महाराज आणि त्यांच्यानंतर मी काय केले हे तमाम जनतेला माहिती आहे. त्यामुळेच आम्हाला सत्ता मिळाली, हे आम्ही कदापी विसरत नाही.  गेल्या 10- 15 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवताना ज्या भागाचे आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्या भागात आपण काय दिवे लावले? याचीही कबुली आपण दिली पाहिजे. केवळ घोकमपट्टी आणि थापेबाजी करुन विकासकामे होत नसतात. स्वत:चे गुण स्वत:च जाहिर केले ते बरे झाले. चुना, तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारु या कोणाच्या आवडीच्या गोष्टी आहेत हे सातारकरच नाही तर संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे चुना लावून बोंब कोण मारतो, हेही सगळ्यांना कळून चुकले आहे.सातारकरांचा आपल्याला किती पुळका आहे हे दाखवत सुटले आहेत.  असे लोकप्रतिनिधी कधी झाले नाहीत आणि यापुढेही होणार नाहीत, अशी टिकाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.

निवडून आल्यानंतर गेल्या 10- 15 वर्षांत किती विकासकामे मंजूर केली आणि किती पूर्णत्वास नेली हा संशोधनाचा भाग आहे. किमान मी बोलल्यामुळे तरी, अशांना आपणही काहीतरी काम करुन दाखवले पाहिजे याची किमान जाणीव तरी झाली. हे ही नसे थोडके, असे खेदाने म्हणावे लागेल. आता निवडणुका तोंडावर आल्या की हातात नारळ घेवून दुसर्‍यांनी मंजूर केलेल्या कामांचा शुभारंभ करायचा आणि लोकांचा बुध्दीभेद करण्यासाठी, खोटा कळवळा दाखवण्यासाठी दुसर्‍यांना नावे ठेवायची, हा नवीन धंदा सुरु करणार्‍यांनी इंजिनिअरने लिहीलेली कामाची यादी वाचून दाखवायची आणि ही कामे मीच केली, असा ढोल बडवायचा. स्वत: काही करायचे नाही पण, दुसर्‍याने मंजूर केलेल्या कामाच्या कोनशिलेवर माझे नाव लागले पाहिजे, हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायचे. कामासाठी नाही तर फक्त नावासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मिरवायचे आणि दुसर्‍याला शहाणपण शिकवायचे आता थांबवा,  असेही आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकात  म्हटले आहे. 

तीन- चार वर्षापूर्वी पालिकेतल्याच एका विद्वान वकिलाने सातार्‍यात पासपोर्ट ऑफिस येणार अशी बातमी पेपरमध्ये देवून मोठी दवंडी पिटली होती. पासपोर्ट ऑफिस सातार्‍यात आले पाहिजे. लोकांना सुविधा मिळालीच पाहिजे. चार वर्षे झाले तरी पासपोर्ट ऑफिस काय सातार्‍यात आले नाही पण, आता नव्याने हे ऑफिस सातार्‍यात येणार अशी पुन्हा बातमी तरी आली. पासपोर्ट ऑफिस, रेल्वे ऑफिस, विमानतळ अरे किती गाजरे दाखवणार आणि जनतेला भूलवणार, असा सवालही आ. शिवेंद्रराजे यांनी केला आहे. नुसतीच बडबड आणि बोलबच्चनगिरी करण्यापेक्षा किमान लोकांना सांगता येईल, असे एखादे तरी काम करा. तेच- तेच गोल फिरवून फिरवून आता त्याचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे फुका बाता  मारण्यापेक्षा स्वत: काहीतरी करुन दाखवा आणि मग बढाया मारा, असा सल्लाही आ. शिवेंद्रराजे यांनी दिला आहे.