सातारा : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतुकीचा ताण हा बसस्थानक, भूविकास बँक ते जुना आरटीओ कार्यालय रस्त्यावर पडला आहे. मात्र, भूविकास बँक ते जुना आरटीओ कार्यालय या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. वारंवार मागणी करूनही सातारा पालिकेकडून या रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी स्वखर्चातून खड्डे मुजवले. त्यांनी स्वत: हातात पाटी घेऊन खड्डे मुजवूून सत्ताधार्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातारा शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच शहरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: दुचाकीस्वार आणि पादचार्यांना जीव मुठीत घेवून मार्गक्रमण करावे लागत आहे. असे असताना पालिकेकडून मात्र खड्डे मुजवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेर आ. शिवेंद्रराजे यांनी स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचा निर्णय घेतला आणि या रस्त्यासह भु विकास बँक ते शानभाग शाळा या मार्गावरील खड्डे मुजवून त्यावर रोलर फिरवण्यात आला.
गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास आ. शिवेंद्रराजे हे मुरुमाने भरलेल्या ट्रॅक्टर- ट्रॉल्या, रोडरोलर आणि मुरुम टाकणारे कामगार यांच्यासह भुविकास बँकेसमोर दाखल झाले. त्यांनी स्वत: मुरुमाने भरलेली पाटी हातात घेवून खड्डे भरण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनीही पाट्या हातात घेवून खड्डे मुजवण्यास प्रारंभ केला. खड्डे मुजवून त्यावर रोलर फिरवण्याचे काम सुरु झाल्याने येणार्या- जाणार्या नागरिकांनी आ. शिवेंद्रराजे यांचे आभार मानले. तसेच सातारा पालिकेच्या कुचकामी कारभाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
दरम्यान, आम्ही विरोधात असल्याने आमदार फंडातून रस्त्याची कामे करायची म्हटले तरी सत्ताधार्यांकडून श्रेयवादापायी पालिकेत ठराव मंजूर केला जात नाही. त्यामुळे इच्छा असूनही शहरातील रस्त्याची कामे होवू शकत नाहीत आणि सत्ताधार्यांना या समस्येचे काहीही सोयरसुतक नसल्यामुळे स्वत: या रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचा निर्णय घेतल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. या कामासाठी कोणताही शासकीय निधी वापरत नसून मी स्वखर्चाने हे काम करत आहे. आता मी काम करतोय म्हटल्यावर पालिका त्यात आडकाठी आणणार हे निश्चित पण, हे काम जनतेच्या हितासाठी होत आहे आणि पालिकेवरील काही अंशी बोजा कमी होत आहे, याचे भान ठेवून पालिकेनेही या कामासाठी सहकार्य करावे. सातारकरांचे अतोनात हाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.