Wed, Nov 21, 2018 20:15होमपेज › Satara › वाहनांचे ‘वर्‍हाड’ रस्त्यावर; कोंडीचा प्रश्‍न ऐरणीवर

वाहनांचे ‘वर्‍हाड’ रस्त्यावर; कोंडीचा प्रश्‍न ऐरणीवर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात सर्वत्र लग्नसराईची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. सातारा शहर व परिसरात सुमारे 50 हून अधिक मंगल कार्यालये असून त्यापैकी निम्म्याहून  अधिक मंगल कार्यालयाकडे पुरेशी पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे लग्नासाठी येणारी  वर्‍हाडी मंडळी आपली वाहने रस्त्यावरच उभी करून मंगल कार्यालयात जातात.  वर्दळीच्या रस्त्यावरच ही वाहने वेडीवाकडी उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

सातारा शहर व परिसरात मंगल कार्यालये  मोठ्या प्रमाणात असली तरी या कार्यालयांना पार्किंगसाठी  स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे मंगल कार्यालय परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शहर व परिसरातील मंगल कार्यालये ही मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरच आहेत.

 या मंगल कार्यालयाकडे पुरेशी पार्किंग व्यवस्था नाही. दिवसेदिवस वाहनांची संख्या वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत रस्त्याची रूंदी आणि पार्किंगच्या  जागा मात्र तेवढ्याच राहत आहेत किंवा त्या आणखी कमी होत आहेत. 

प्रत्येक मंगल कार्यालयाने येणार्‍या वर्‍हाडींच्या वाहनांसाठी आपली स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे बंधनकारक असतानाही अनेक मंगल कार्यालयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. तर काही मंगल कार्यालयाची बांधकामे करताना पार्किंग व्यवस्थेचा फारसा विचार केलेला नसल्याने विवाह सोहळ्यासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त पध्दतीने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी हा विषय नित्याचाच बनला आहे. 

काही मंगल कार्यालयांनी  मोकळ्या जागेत लॉन्स निर्माण केले आहेत. मात्र पाकिर्ंंगसाठी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. मंगल कार्यालयासमोर रस्त्यावर लावण्यात येणार्‍या  वाहनांवर वाहतूक पोलिस काहीही कारवाई करताना दिसत नाहीत. मंगल कार्यालयाचे व्यवस्थापनही नामानिराळे राहत आहेत. विवाह म्हटले की मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी  लोकप्रतिनिधीही आवर्जून  टायमिंग गाठून  येत असतात मात्र यांचा ताफाही भर वर्दळीच्या रस्त्यावरच थांबत असतो. आपल्या वाहनामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होईल याचे त्यांना काहीही सोयरसुतक नसते. त्यामुळे कायदे बनवणारेच पालन करत नसल्याचे चित्र  पहावयास मिळत असते.