होमपेज › Satara › लग्न सोहळ्यांवर चोर्‍यांचे सावट

लग्न सोहळ्यांवर चोर्‍यांचे सावट

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 9:44PM

बुकमार्क करा

सातारा : मीना शिंदे

यंदाच्या लग्नसराईला  धुमधडाक्यात सुरुवात झाली असून अनेक विवाह इच्छुकांचे बार उडू लागले आहेत. लग्नाची धामधूम सुरू असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वर्‍हाडी मंडळी सेल्फीच्या नादात तर चोरटे संधीच्या शोधात अशी परिस्थिती असते. त्यामुळे रोकड व दागिने चोरीस जाण्यापेक्षा लग्नसमारंभात अनोळखी व संशयितांबाबत नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. 

तुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरू झाले आहे. ठिकठिकाणी लग्नाचे बार उडू लागले आहेत. सध्या कुठलाही इव्हेंट असो. सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. मात्र  फोटोरुपी आठवणी गोळा करण्याच्या  नादात  पर्स, पाकीट, तसेच दागिन्यांसारख्या ऐवजांवर चोरटे डल्ला मारू लागण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे  त्यामुळे वर्‍हाडी मंडळींंनो, सावधान म्हणण्याची वेळ आली आहे. 

लग्नसमांरभात वधू-वरांसह करवली मंडळी आपली हौस-मौज भागवून घेत आहेत. या  विवाह सोहळ्यांमध्ये मान-पानासोबतच फोटोसेशन महत्त्वाचे असतेच. तरुणाईकडून मोबाईलमध्ये सेल्फीला प्राधान्य दिले जात असले तरी वधू वरांसोबत फोटो काढण्याची हौस वर्‍हाडी मंडळींना भारी पडत आहे.  वधू-वरांसोबत फोटो काढण्यासाठी आपल्या जवळील पर्स, बॅग बाजूला ठेवतात. फोटो काढण्याचा सोहळा बहरात आलेला असतो. त्यामुळे आपण ठेवलेल्या पर्स, बॅग, भेटवस्तू या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. हीच संधी चोरटे साधतात. आणि हातोहात या वस्तू लांबवतात. लहान मुले, महिला यांचा या चोरट्यांच्या टोळीमध्ये समावेश असतो. या चोरीमध्ये वधू-वरांच्या आई-वडिलांच्याही वस्तू चोरी होण्याच्या घटना लग्न सोहळ्यात होत आहेत. अनेकदा ड्रेसिंगरुममध्येदेखील हे चोरटे घुसत आहेत. कार्यमालकाला आलेली आहेराची पाकिटेसुध्दा चोरट्यांच्या कचाट्यातून सुटत नाहीत. यामध्ये महिलांबरोबर लहान मुलांचा वापर केला जात आहे.

विवाह सोहळा म्हटले की नटणे-मुरडण्याची हौस आलीच. यावेळी संधी साधून ड्रेसिंग रुममध्ये चोरटे घुसतात आणि पर्स, तसेच काढून ठेवलेले दागिने यावर हात साफ करतात. लग्न सोहळ्यात सर्व नातेवाईक  आणि नागरिकांची गर्दीचा फायदा घेवून चोरटे चोरी करुन पसार होतात. फोटो काढावयास जाताना जबाबदार नातेवाईकांकडेच आपली वस्तू किंवा पर्स सांभाळण्यास द्यावी. तसेच वधू वरांच्या खोलीत असे अनोळखी किवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ बाहेर काढावे. चोरी होण्यापूर्वी खबरदारी घेतल्यास नंतर पश्‍चात करण्याची वेळ येणार नाही.