Tue, Jul 16, 2019 11:47होमपेज › Satara › मराठी दिनाचा सोशल मीडियावर गजर

मराठी दिनाचा सोशल मीडियावर गजर

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 28 2018 1:12AMसातारा : प्रतिनिधी

 ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जानतो मराठी,  एवढ्या  जगात माय मानतो मराठी,  बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी’ अशा विविध संदेशाच्या देवाणघेवाणीतून सोशल मिडीयावर मराठी भाषा दिनाचा  मंगळवारी जागर सुरू होता.

जागतिक मराठी भाषा दिवस व  मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही मागणी विविध स्तरातून होत आहे.आज जागतिक मराठी भाषा दिन, मराठी भाषा जपली पाहिजे,  रूजली पाहिजे अशा विविध संदेशाची देवाणघेवाण सोशल मिडीयावर सुरू झाली होती. लाभले आम्हास भाग्य , बोलतो मराठी, अशी संगीतमय गाणी आणि त्या संबंधीचे व्हिडिओही शेअर करण्यात आले तर लाखो लोकांच्या व्हॉटस्अप स्टेटसवर मराठी दिनाच्या शुभेच्छा, ऑडिओ व व्हिडिओ क्लिप ठेवण्यात आल्या होत्या. 

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा, हिच्या  संगाने जागल्या दर्‍याखोर्‍यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात, अशा या कवितांची कडवी फेसबुक,ट्विटर आणि व्हॉटस्अपवर व्हायरल होत होती. 

मराठी माझा शब्द, माझे विचार, माझा श्‍वास, माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी, मराठी भाषा, मराठी मन, अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा, मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, रूजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी, स्पंदते मराठी, स्पर्शते मराठी, गुंजते मराठी, गर्जते मराठी,  अशा काव्य पंक्तींचा जागर सोशल मिडीयावर दिवसभर सुरू होता.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच विविध सामाजिक संघटना, संस्था व अन्य शासकीय कार्यालयातही मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम साजरे करण्यात आले. विविध शाळांमध्ये दिंड्या काढून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. या दिंड्यांत मराठी भाषेबद्दल लिहीलेली विविध घोषवाक्ये आकर्षण ठरली होती. पारंपारिक मराठमोळ्या वेशभुषेत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय ठरला.