Fri, Aug 23, 2019 14:27होमपेज › Satara › सातारा : तीन तास दगडफेक; एसपींसह १० पोलिस जखमी

सातारा : तीन तास दगडफेक; एसपींसह १० पोलिस जखमी

Published On: Jul 25 2018 4:58PM | Last Updated: Jul 25 2018 5:14PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील काही भागासह महामामार्गावर गेल्या तीन तासापासून अक्षरशः धुमश्चक्री सुरू आहे. काही ठिकानी तुफान दगडफेकीच्या घटना घडल्‍या आहेत. यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह सुमारे 10 पोलीस जखमी झाले आहेत. दगडफेकीत स्थानिक दुकाने, शोरूमना लक्ष्य झाले आहेत. यावेळी पोलिसांनी सुमारे 30 जणांची धरपकड केली आहे. दरम्यान एसपी संदीप पाटील यांच्याकडून शांततेचे आवाहन करण्यात आले असून परिस्‍थिती नियंत्रणात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चा समाप्त झाल्यानंतर दुपारी 12 वाजता मात्र महामार्गावर जमाव संतप्त बनला. या घटनेची माहिती सातार्‍याचे एसपी संदीप पाटील यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. यावेळी जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. याचवेळी दगडफेकीला सुरुवात झाली. यात स्वतः एसपी संदीप पाटील जखमी झाले यावेळी त्यांच्या गाडीवरही दगडफेक झाली. तात्काळ त्यांना घटनास्थळावरून हलवून पोलीसानी बळाचा वापर केला. दरम्यान, एसपी संदीप पाटील यांना हाताला लागले असून मुख्यालयात त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांना पाचारन करण्यात आले आहे. 

पाहता पाहता वातावरण चिघळून महामार्ग, विसावा नाका, कोरेगाव रोडवर धुमश्चक्रीला सुरुवात झाली. जमाव पोलिसांवर दगडफेक करत होता तर पोलीस अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत होते. चारही बाजूला ही परिस्थिती निर्माण झाल्याने सातारा हादरून गेला. यावेळी जमावाने दुकान, शोरूम, गाळ्यावरही मोठ्‍या प्रमाणात दडफेक केली.

दरम्‍यान पोलिस अधीक्षक यांनी साताऱ्यातील परिस्थिती निवळली असल्याचे सांगितले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. बॉम्बे रेस्टॉरंट येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही भेट दिली आहे.