Wed, Jun 26, 2019 18:24होमपेज › Satara › मंडळांच्या मूर्ती विसर्जनाचा निर्णय प्रलंबितच

मंडळांच्या मूर्ती विसर्जनाचा निर्णय प्रलंबितच

Published On: Sep 12 2018 1:50AM | Last Updated: Sep 11 2018 11:36PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील गणेश विसर्जन तळ्यांवर अद्यापही चर्चाच सुरू आहे. मंगळवार तळे, मोती तळे तसेच फुटका तलावासंदर्भात अद्यापही हायकोर्टाचे आदेश प्राप्त न झाल्याने मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी पर्यायी तळ्यांवर प्रशासन तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांमध्ये खल सुरू होता. घरगुती गणेश विसर्जनासाठी नगरपालिका पोहण्याचा तलाव तसेच गोडोली, सदरबझार दगडी शाळा व हुतात्मा स्मारक येथे कृत्रिम तळी काढली जाणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम,  अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, प्र. सातारा प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, मुख्याधिकारी शंकर गोरे व गणेश मंडळांचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, जे काय होईल ते कायदेशीर होईल. बेेकायदेशीर कोणताही प्रकार निदर्शनास आणावा. मंगळवार तळ्यासंदर्भात कोर्टाचे काय आदेश आहेत, याची विचारणा त्यांनी मुख्याधिकार्‍यांना केली. मात्र, कोर्टाचे आदेश प्राप्त झाले नसल्याने जिल्हा प्रशासनाने मंगळवार तळ्यासह शहरातील इतर पर्यायी तळ्यांवर चर्चा केली. यावेळी मंगळवार तळ्यासह गोडोली तळ्याचा पर्याय असावा, यावर चर्चा झाली. शिवाय कण्हेर धरणासाठी त्याठिकाणी काढलेल्या खाणीत विसर्जन करता येईल, असेही काही पदाधिकार्‍यांनी सुचवले. गणेश मंडळांनी मूर्ती ताब्यात दिल्यास प्रशासनाकडून कृष्णा नदीत विसर्जन केले जाईल, यावरही चर्चा झाली. मात्र ही बाब अनेकांना पटली नाही. कोर्टाचा आदेश येईपर्यंत पहिल्या सात दिवसांत होणार्‍या घरगुती गणेश विसर्जनाची तयारी करण्यादृष्टीने चर्चा झाली. त्यानुसार नगरपालिकेचा पोहण्याचा तलाव, सदरबझार येथील दगडी शाळा, हुतात्मा स्मारक, गोडोलीत अण्णासाहेब कल्याणी हायस्कूलसमोर न. पा. जागेत कृत्रिम तळी काढली जाणार आहेत. त्याठिकाणी सर्व सुविधा न.पा.कडून उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.  यावेळी हुतात्मा स्मारक तसेच रविवार पेठेतील पोलिस चौकीमागील न. पा. खुल्या जागेत कायमस्वरुपी कृत्रिम तळी काढण्यावर चर्चा झाली. रविवार पेठेत तळे काढायचे असेल तर यंत्रसामग्री पुरवली जाईल, असे अशोक मोने तसेच अशोक घोरपडे यांनी सांगितले.  यावेळी पंकज देशमुख म्हणाले, लोकशाही मार्गाने सर्वांना विचारात घेवून विसर्जन तळी निश्‍चित केली जातील. वेळ पडल्यास माजी सैनिकांचीही बंदोबस्तासाठी मदत घेतली जाईल. सातारकरांनी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.

श्‍वेेता सिंघल म्हणाल्या, विसर्जन तळ्यासंदर्भात पाहणी केली जाईल. नगरपालिकेने यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना प्रशासन मदत करेल. तांत्रिक बाबींसाठी पाटबंधारे विभागाचीही मदत दिली जाईल.