Fri, Mar 22, 2019 23:01होमपेज › Satara › गावचा विकास करून शाश्‍वत आनंद मिळवा 

गावचा विकास करून शाश्‍वत आनंद मिळवा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

गावांचा विकास झाला तरच शहरं सुरक्षित राहतील. गावांचा शाश्‍वत विकास आणि  शाश्‍वत आनंद निर्माण करणे हे ग्रामसेवकांसह गाव, सरपंच, ग्रामसेवक यांच्या हातात आहे. त्यामुळे ग्रामसेवकांनी आपण शासनाचे सेवक असून गावाचा विकास करणे हे आपले कर्तव्य समजून काम करावे. 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा संपूर्ण अधिकार ग्रामपंचायतीचा आहे, त्यामुळे गट तट विसरुन गावाच्या विकासासाठी हा निधी खर्च करावा, असे आवाहन आदर्श ग्राम संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.

सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने सरपंच आणि ग्रामसेवक यांची स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात  कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.  आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत जगताप, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे उपस्थित होते.
पोपटराव  पवार  म्हणाले,       राज्यात आदर्श गाव योजनेत सुमारे  100 गावांचे उद्दिष्ट असतांनाही आत्तापर्यंत केवळ 90 गावे झाली असून आदर्श ग्राम योजनेचे नियम आणि निकष अनेक गावांना कठीण वाटतात. पण या अटी गावाच्या कल्याणासाठी गरजेच्या आहेत. जसे की, नशाबंदी, कुर्‍हाड बंदी, पर्यावरण संरक्षण यामुळे गाव आणि शिवार दोन्ही गोष्टींच्या विकासाला पूरक ठरतात. त्यामुळे लोकांनी आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात ग्राम विकास आणि कृषी विकास असंघटीत क्षेत्रात  मोडत असल्यामुळे हे काम करणे सुरुवातीला कठिण ठरते. ग्रामपंचायत ही यंत्रणा गाव बदलण्यासाठी खूप महत्वाची असून गावातील नागरिकांची   गरज ओळखून कामे करणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी आहे. 

1992 साली पंचायत राज घटना दुरुस्ती झाली. त्यानंतर गाव स्वावलंबी करण्यासाठी अनेक यंत्रणा सतत झटत आहेत. पण म्हणावा तसा परिणाम होत नाही. आता गावकर्‍यांनी आपल्या गावचा विकास शासनाच्या मदतीने आपणच करणे गरजेचे आहे. शाळांची पट संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे. आरोग्य केंद्र, शाळा यात सुधारणा करणे गरजेचे असल्याचेही पवार यांनी सांगितले.
उपायुक्त बळवंत टोपे यांनी वस्तू आणि सेवा कर या विषयावर, नगररचनाचे सहाय्यक संचालक श्रीकांत देशमुख  यांनी बांधकाम परवाने आणि पूर्णत्वाचे दाखले याबाबत घ्यायची काळजी या विषयावर, आंनद भंडारी  यांनी ग्रामपंचायत विकास आराखडयाबाबत तर चंद्रकांत पवार  यांनी  विविध  शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.