Wed, May 22, 2019 16:16होमपेज › Satara › स्वाभिमान दिवस महाराष्ट्राने साजरा करावा

स्वाभिमान दिवस महाराष्ट्राने साजरा करावा

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:29PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

छत्रपती शाहूंच्या काळातील मराठ्यांचा साम्राज्य विस्तार हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वांत मोठा व वैभवशाली आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्हाला अर्धवट इतिहास शिकवला. दिल्लीवर राज्य गाजवणारा आपला वंशज आहे, याचे भान मराठी माणसात जागे करायचे असेल तर स्वाभिमान दिवस सार्‍या महाराष्ट्राने साजरा करावा, असे आवाहन ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व गडकोट संवर्धन समितीचे मुख्य सल्लागार पांडुरंग बलकवडे यांनी केले.  

छत्रपती शाहूंचा राज्याभिषेक दिन, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व युवक दिन यांचे औचित्य साधून अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर सातारा शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीतर्फे आयोजित स्वाभिमान दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. संदीप महिंद गुरूजी, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, सुदाम गायकवाड, डॉ. संदीप काटे, अमर जाधव, अजय जाधवराव, सभापती यशोधन नारकर, पं. स. सदस्य आशुतोष चव्हाण, सुजाता राजेमहाडिक, दीपक प्रभावळकर उपस्थित होते.  

पांडुरंग बलकवडे म्हणाले, मराठ्यांची राजधानी असणार्‍या अजिंक्यतार्‍यावर स्वाभिमान जागृत करणारी चळवळ निर्माण व्हावी हे माझे 30 वर्षांपासूनचे स्वप्न होते. मराठी साम्राज्याच्या सीमा सार्‍या आशिया खंडात पसरत होत्या, तेव्हा छत्रपती शाहू हेच त्याचे केंद्रबिंदू ठरले. इतिहास निर्माण करणारी माणसे आज इतिहास विसरली आहेत. मराठ्यांनी एकदा-दोनदा नव्हे तर अनेकदा दिल्ली काबिज केली आहे. दिल्लीवर आलेली आक्रमणे मराठ्यांच्या घोड्यांच्या  टापा ऐकूनच पळून गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच स्वाभिमान दिवस सातार्‍याने नव्हे तर सार्‍या मराठी वर्षाने साजरा करण्याची गरज आहे. अजिंक्यतारा हा शहरापासून जवळ असलेला राज्यातील एकमेव किल्ला आहे. त्याच्या संवर्धनाकडे झालेले दुर्लक्ष वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी डॉ. संदीप महिंद, अजय जाधवराव, सौ. माधवी कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन दीपक प्रभावळकर यांनी केले. आभार शेखर तोडकर यांनी मानले.