Fri, May 24, 2019 21:25होमपेज › Satara › प्रेमाची माहिती टाळण्यासाठी आईकडून मुलींनाच मारहाण

प्रेमाची माहिती टाळण्यासाठी आईकडून मुलींनाच मारहाण

Published On: May 25 2018 4:40PM | Last Updated: May 25 2018 6:21PMसातारा : प्रतिनिधी

परपुरुषाशी असलेल्या प्रेमाबाबतची माहिती पतीला समजू नये यासाठी जन्मदात्या आईने प्रियकरासोबत दोन्ही मुलींना दमदाटी, शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना सातार्‍यात घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना सातार्‍यातील शाहूपुरी येथे घडली आहे. तक्रारदार अल्पवयीन मुलगी 17 वर्षांची असून तिच्या आईचे एका परपुरुषाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मुलींना मिळाली. तक्रारदार मुलगी व तिच्या बहिणीलाही या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आईचा संताप अनावर झाला. प्रेमासंबंधाची बाब समोर आल्याने व ते पतीला कळू नये, यासाठी जन्मदात्या आईने दोन्ही मुलींना दमात घेतले. एवढ्यावरच न थांबता तिने पट्ट्याने व हाताने मारहाण करून शिवीगाळही केली. अखेर याबाबतची वाच्यता केल्यास खैर नसल्याचे सांगून दमदाटीही मुलींना करण्यात आली. आईच्या या कृत्यामुळेे सख्ख्या बहिणी घाबरल्या  व घडलेल्या घटनेबाबत त्यांनी वडिलांना सांगितले. वडिलांनी दोन्ही मुलींना घेऊन थेट शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ तक्रार दाखल करुन घेतली. तक्रारीनुसार मुलींच्या आई व तिच्या प्रियकरावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या सर्व घटनेमुळे परिसरासह सातार्‍यात खळबळ उडाली असून प्रेमप्रकरणातून आईनेच मुलींना मारल्याने पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.