Sat, Apr 20, 2019 10:12होमपेज › Satara › कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या मोदीला अगोदर पकडा : शरद पवार (व्‍हिडिओ)

कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या मोदीला अगोदर पकडा : शरद पवार (व्‍हिडिओ)

Published On: Feb 18 2018 3:53PM | Last Updated: Feb 18 2018 4:42PMलोणंद : प्रतिनिधी

देशातील एक नंबर बँक म्हणून सातारा जिल्हा बँकेचा गौरव केंद्र सरकार करते आणि राज्य सरकार म्हणतंय बँकेची चौकशी केली पाहिजे. चांगली गोष्ट आहे; पण चांगले काम करणार्‍यांची चौकशी करण्याआधी जो 11 हजार कोटी चोरून परदेशात गेलाय त्या नीरव मोदीला अगोदर पकडा. सध्या राज्य सरकारला चौकशीवरच जास्त प्रेम झाले आहे. आपण कृषिमंत्री असताना शेवटच्या घटकाच्या भल्यासाठी काम केले. त्याची चौकशी  करणार असाल खुशाल करा; परंतु सामान्य माणसांची बांधिलकी सोडणार नाही व ते काम केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण खा. शरद पवार यांनी केले.

लोणंद येथील बाजार समितीच्या आवारात खा. शरद पवार यांच्या संसदीय कायदेमंडळातील कारकिर्दीस पाच दशके पूर्ण झाल्याबद्दल येथील सुवर्णगाथा उत्सव समिती, साद सोशल ग्रुप, विकासधारा मंच, कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि लोणंद, फलटण, वाई, कोरेगाव आदी बाजार समित्यांच्या वतीने आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, माजी खा. लक्ष्मणराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, जि. प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी आ. विक्रमसिंह पाटणकर, कृषी सभापती मनोज पवार, जि. प. सदस्य उदय कबुले, सौ. दिपाली साळुंखे, सभापती मकरंद मोटे, वंदनाताई धायगुडे, राजेंद्र तांबे, दत्तात्रय बिचुकले, डॉ. नितीन सावंत व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

खा. शरद पवार म्हणाले, आपण कृषी मंत्री असताना दुष्काळी भागात जावून पाहणी केली, निर्णय घेतले. जनावरे जगवली. आता छावण्या चालवून तडफडणार्‍या जनावरांचे प्राण वाचविणार्‍यांची चौकशी करून खटले भरण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. परंतु, त्यावेळी निर्णय घेऊन धोरण राबवले नसते तर आज राज्य सरकारवर खटले भरावे लागले असते. आम्ही समाजातील शेवटच्या घटकाच्या भल्यासाठी काम केले आहे. त्याची चौकशी होत असेल तर खुशाल चौकशी करा पण, आपण सामान्य माणसांची बांधीलकी सोडणार नाही. 

खा. पवार पुढे म्हणाले, डॉ. नितीन सावंत व त्यांच्या सहकार्‍यांनी साद सोशल ग्रुपच्या माध्यमातून लोणंदमध्ये अत्यंत दर्जेदार असे कृषी प्रदर्शन भरवले. त्याचा लाभ शेतकर्‍यांना निश्‍चित होईल. दरवर्षी भरवण्यात येणार्‍या येथील कृषी प्रदर्शनाला सर्व सहकार्य केले जाईल. देशातील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला जाईल. 

माझा सत्कार महत्वाचा नव्हता पण, लोणंद व खंडाळकरांचे प्रेम गप्प बसू देत नाही. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या विचाराने प्रेरित झालेला हा तालुका आहे, असेही ते म्हणाले. 

ना. रामराजे म्हणाले, ग्रामीण भागाची जाण असणारे नेते खा. शरद पवार आहेत. अनेक नेते येतात अन् जातात. पण, शेतकर्‍यांचा तारणहार म्हणून त्यांना संबोधले जाते. शेती मालाला चांगली किंमत आली पाहिजे, ही सर्वांची भावना आहे. परंतु, सध्या चाललेले राजकारण चांगले नाही. त्यामुळे खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.

आ. मकरंद पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून लोणंद कृषी प्रदर्शनाचे स्वप्न साकार होत आहे. खा. शरद पवार यांनी सर्वच क्षेत्रात चांगले काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे चांगले काम होत आहे. पाण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. तालुका पुढे चालला आहे. लोणंदला अभिमान वाटावे, असे कृषीप्रदर्शन दरवर्षी भरवले जाईल. 
संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, लोणंदला दरवर्षी कृषी प्रदर्शन भरणार असल्याने  शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञान शिकायला मिळणार आहे.

कार्यक्रमात खा. शरद पवार यांचा जाहीर नागरी सत्कार सुवर्णगाथा उत्सव समितीच्या महिला व पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्तविक डॉ. नितीन सावंत यांनी केले. स्वागत योगेश क्षीरसागर, सागर शेळके, गजेंद्र मुसळे, रविंद्र क्षीरसागर, विश्‍वास शिरतोडे, भिकु रासकर, संभाजी घाडगे यांनी केले. 

लक्ष्मणराव शेळके, दत्तानाना ढमाळ, शामराव गाढवे, नामदेव धायगुडे, रमेश शिंदे, शिवाजीराव शेळके, सुभाष घाडगे, विठ्ठल शेळके, गणीभाई कच्छी, हेमंत कचरे आदी उपस्थित होते. आभार हणमंत शेळके यांनी मानले.