लिंब : वार्ताहर
सातारा शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर लिंब-गोवे गावच्या निसर्गरम्य परिसरात, कृष्णा नदीच्या पात्रात असणाऱ्या बेटावर महादेवाचे मंदिर आहे. हे महादेवाचे स्वयंभू स्थान असून, ते श्री कोटेश्वर नावाने प्रसिद्ध आहे.
कोटेश्वराचे मंदिर कृष्णा नदीच्या पात्रात असून, मंदिराच्या दोन्ही बाजूंनी कृष्णा नदी वाहते. कोटेश्चराचे मंदिर भव्य दिव्य असुन, पुर्वाभिमुख आहे. मंदिराचे बांधकाम कोरीव दगडात केलेले आहे, तर कळसावर कोरीव रेखीव कलाकुसर पाहण्यासारखी आहे. मुख्य मंदिराच्या पुढे भव्य अशी कमान असून, त्यावर जुना नगारखाना आहे. त्याच्या पुढील बाजूस तीर्थ कुंड आहे. या मंदिराचे एक वेगळेपन म्हाणजे मंदिरात शिवलिंगापुढे एक आणि तीर्थकुंडापुढे एक असे दोन नंदी पाहण्यास मिळतात. या मंदिरात प्रवेश करतेवेळी प्रथम गणपतीचे उत्तराभिमुखी मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशवाईतील सरदार नारो आप्पाजी खरे ( तुळशीबागवले ) यांनी शके १६६५ साली महाशिवरात्रीच्या दिवशी केला आहे.
कोटेश्वर देवस्थानविषयी कृष्णा महात्म ग्रंथात सोळाव्या अध्यायात लिहले आहे की, कोटीतीर्थ कोटीश्वर ।। तेथेचि असे अगस्तीश्वर ।। धन्य अगस्ती परशघर ।। कृतार्थ कृष्णा प्रसादे ।। असा उल्लेख केला आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, सहस्त्रार्जुनाने जमदग्नी ऋषींचा वध केल्याने विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामाने रागावून एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली.
यावेळी परशुरामाने आपण मोठे पाप केले आहे असे समजून त्यांनी ती कश्यप ऋषींना दान केली व फिरू लागले. या दरम्यान त्यांना अगस्ती ऋषी भेटले. यावेळी परशुरामाने आपले दुःख बोलून दाखवत मार्ग दाखवण्यास सांगितले तेव्हा आगस्ती ऋषींनी परशुरामाला आपल्या आश्रमात आणून पापातून मुक्त होण्यासाठी शतकोटी रुद्रजप आणि कृष्णास्नान व शिवजप करण्याचा उपाय सुचविला. त्याप्रमाणे परशुरामाने फक्त पाणी प्राशन करून अनेक वर्षे अनुष्ठान केले ही उग्र तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामस स्पर्श करून पाप मुक्त केले व वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने मी कोटी कोटी पापातून मुक्त झालो आहे, हे स्थान कोटीतीर्थ झाले तेव्हा आपण याठिकाणी रहावे अशी विनंती केली यावर शंकर तथास्तू म्हणाले यावेळी याठिकाणी शिवलिंग प्रकट झाले तेच हे शिवलिंग कोटेश्वर होय.
या स्थानाविषयी दुसरी आख्यायिका असून, त्यानुसार कृष्णा नदी जिथे उगम पावते त्या क्षेत्र महाबळेश्वर पासून लिंब-गोवे येथील श्री कोटेश्वर मंदिरापर्यंत कृष्णा नदीच्या काठावरून जितकी शिवलिंगे आहेत त्यांची संख्या मोजली तर प्रथम श्री महाबळेश्वरचे शिवलिंगापासून श्री कोटेश्वर मंदिरापर्यंत एक कोटी शिवलिंगे आहेत तेच हे एक कोटीवे शिवलिंग होय तेच कोटीईश्वर यानावाने ओळखले जात होते. या कोटीईश्वरचा अपभ्रंश होऊन कोटेश्वर झाले आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिण्यातील सोमवारी या मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.