Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Satara › सनातनकडून जिवीताला धोका : उपराकार  लक्ष्मण माने

सनातनकडून जिवीताला धोका : उपराकार  लक्ष्मण माने

Published On: Jan 19 2018 5:29PM | Last Updated: Jan 19 2018 5:29PMसातारा : प्रतिनिधी

‘सनातन’सारख्या उजव्या संघटनेकडून आपल्या जीविताला धोका असून, अशा संघटनांवर बंदी घातली गेली पाहिजे. आपणाला बलात्कार प्रकरणातून सातारा जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्‍त केले असतानाही  ‘सनातन प्रभात’मधून नुकतेच ‘बलात्कारी’ असे म्हणून संबोधले आहे. दरम्यान, बलात्कार प्रकरणात आपल्याच शाळेतील शिक्षकांनी गोवले असल्याचा गौप्यस्फोट करत चौघांवर प्रत्येकी 10 लाख रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. सामाजिक चळवळीतील आणखी काही लोकांवरही दावा ठोकणार असल्याचे ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लक्ष्मण माने पुढे म्हणाले, आपले सामाजिक व राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी शाळेतीलच शिक्षकांनी सहा महिलांना हाताशी धरले. त्या महिलांच्या  माध्यमातून बलात्काराच्या कटात हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक गोवले. त्या शिक्षकांना सहकार्य करण्यासाठी आणखी काही राजकीय व सामाजिक व्यक्‍तींचा निश्‍चित सहभाग असून लवकरच त्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेद्वारे देऊन त्यांच्यावरही अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे.

आपण राज्यघटनेला मानत असल्याने बलात्कार प्रकरणातील माझ्यावरील आरोपाच्या चौकशीदरम्यान सन मार्च 2013 ते ऑक्टोबर 2016 दरम्यान सर्व न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे गेलो. या सर्व कालावधीत आपण राजकीय, सामाजिक कार्यक्रमातही सहभागी झालो नाही. दरम्यान, बलात्कार प्रकरणात अंतिम निकाल देताना न्यायाधिशांनी आपणास कटात अडकवल्याचे म्हटले आहे. बलात्काराच्या कथित आरोपासंबंधाने आपण पुस्तक लिहीत असून त्यामध्ये कट कारस्थान करणार्‍यांसह सर्वांचा समाचार घेतला असल्याचेही माने यांनी सांगितले.

नुकतेच सनातन प्रभातने त्यांच्या वेबसाईटवर बलात्कारी लक्ष्मण माने असे म्हटले आहे. वास्तविक याच संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून सहा महिन्यांपूर्वी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आपल्याविरुध्द तक्रार दिली आहे. त्यानंतर आता बलात्कारी म्हणून उल्‍लेख केल्याने आपल्याविरुध्द षडयंत्र रचण्याचा प्रकार होत असून बदनामी करण्याचा हा आणखी एक प्रकार आहे.

न्यायालयाने निकाल दिला असतानाही ही संघटना कायद्याला मानत नसल्याचेही समोर येत आहे, असेही माने यांनी सांगितले.  दरम्यान, भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांच्यावर भिमा कोरेगाव प्रकरणी गुन्हा दाखल आहे. असे असतानाही पोलिस त्यांना अटक न करता त्यांच्या कार्यक्रमांना संरक्षण देत आहेत. देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. यामुळे या दोघांनाही आपल्यासारखे पोलिस व न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे व त्यांनी निर्दोषत्व सिध्द करावे, असे आवाहनही लक्ष्मण माने यांनी यावेळी केले.