Sun, Apr 21, 2019 06:00होमपेज › Satara › अजिंक्यतार्‍यावर पुन्हा बिबट्या

अजिंक्यतार्‍यावर पुन्हा बिबट्या

Published On: Mar 22 2018 10:41PM | Last Updated: Mar 22 2018 10:31PMसातारा : प्रतिनिधी

अजिंक्यतारा किल्ल्यावर बिबट्यांचा वावर दररोज वाढला असल्याने किल्ल्यावर फिरावयास जाणार्‍या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी दुपारी चारभिंती ते स्मृतीवन परिसरातील झाडीत पुन्हा बिबट्या दिसल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली, तर काहींनी या बिबट्याची छबी मोबाईलमध्ये कैद केली. दरम्यान, काही जागरूक नागरिकांनी वन विभागाकडे तक्रार केली. 

अजिंक्यतार्‍यालगत असलेल्या  निसर्ग कॉलनी, रामराव पवारनगर, गोळीबार मैदान परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर वाढला आहे. हे बिबटे नागरिकांना दिवसाही दिसू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी दुपारी काही नागरिक किल्ल्यावर फिरावयास गेले होते. त्यावेळी चारभिंती ते अजिंक्यतारा स्मृतीवन परिसरात असणार्‍या महादेव मंदिर परिसरातील झाडीत बिबट्या बसल्याचे आढळून आले. बिबट्या दिसताच भीतीने गाळण उडालेल्या नागरिकांनी तेथून पळ काढला. तसेच त्या दिशेने जाणार्‍या नागरिकांनाही बिबट्या असल्याचे सांगून सावध केले. याबाबतची माहिती फिरावयास येणार्‍या नागरिकांना कळाल्यानंतर नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

या घटनेची माहिती शहर पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी काही नागरिकांनी मोबाईलमध्ये बिबट्याची छबी टिपली. मात्र, नागरिकांचा गोंगाट पाहता बिबट्याने दाट झाडीच्या दिशेने प्रस्थान केले. वनक्षेत्रपाल महेश पाटील वनरक्षक सुहास भोसले, अमोल भालेकर, निलेश रजपूत, वर्षा देसाई यांच्यासह पोलिसांनी बघ्यांची गर्दी पांगवली. 

दरम्यान,  या परिसरात बिबट्याचा वावर दररोज वाढत चालला असून येथील फिरावयास जाणार्‍या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी वनविभागाने या घटनेची त्वरीत दखल घेवून या परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

Tags : satara, leopard, seen , ajinkyatara,