Thu, Jul 18, 2019 15:06होमपेज › Satara › खंबाटकी घाट : 'एस कॉर्नर'ची बळींची भूक भागेना (video) 

खंबाटकी घाट : 'एस कॉर्नर'ची बळींची भूक भागेना (video) 

Published On: Apr 10 2018 1:14PM | Last Updated: Apr 10 2018 1:13PMखंडाळा : श्रीकृष्ण यादव 

साताऱ्याहून पुण्याकडे जाताना खांबाटकी बोगदा ओलांडून बेंगरुटवाडी गावानजीक महामार्गावर असणारे इंग्रजी एस आकाराचे वळण अनेकांचा कर्दनकाळ ठरले आहे . महामार्गाच्या चौपदरीकरणात खांबाटकी बोगद्याची निर्मिती झाली . तेव्हापासून या एस कॉर्नरने शंभरहून अधिक बळी घेतले आहेत, तर अनेकांना कायमचे जायबंदी केले आहे. 

महामार्गाच्या चौपदरीकरणात खांबाटकी टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दी , बोगद्यापासून खंडाळा बाजूकडील तीव्र उतार लक्षात घेऊन टोलनाक्याजवळ वाहनांचा वेग कमी व्हावा, या उद्देशाने येथे रस्त्याला वळण दिले आहे. त्यामुळे जुन्या टोल नाक्यावर होणारे संभाव्य अपघात टळले असले तरी एस कॉर्नरवर भीषण अपघातांची मालिका सतत सुरू आहे.

या ठिकाणी असणारा तीव्र उतार, वाहनांचा वाढता वेग, एस आकाराचे वळण यामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने येथे अपघात होतात. धोकादायक वळण असल्याची पूर्वसूचना देणारे फलक बोगदा ओलांडल्यानंतर प्रशासनाने लावले आहेत. रात्रीच्यावेळी या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करण्यात येते असल्याने या वळणावर मोठे अपघात होत आहेत. 

वारंवार होणारे अपघात, त्यात होणारी जीवित व वित्तहानी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने रस्त्याचा तांत्रीक दोष दूर करुन उपाययोजना करण्यासंदर्भात अनेकदा रस्ते विकास महामंडळाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यावर जुजबी उपाययोजना करण्यात आल्या आहेत मात्र अपघातांचे सत्र सुरूच आहे. 

या एस कॉर्नरवर खंडाळ्याचे माजी सभापती अविनाश धायगुडे-पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला होता. गतवर्षी गुजरात येथील बसचा अपघात, कंटेनर क्रुझर जीपवर पलटी झालेला अपघात, पुण्याच्या व्यापाऱ्यांचा कार अपघात, अनेक कंटेनर, गॅस टँकर पलटी होऊन झालेले असे अनेक अपघातात शंभरहून अधिक जणांचा जीव गेला आहे.

मंगळवारी पहाटे पाच वाजता कर्नाटकातील कामगारांना घेऊन निघालेल्या आयशर ट्रकचा झालेला अपघात हा आजवरचा या ठिकाणचा सर्वात मोठा अपघात आहे. या अपघातानंतर पोलीस व स्थानिक पारगाव खंडाळ्याचे ग्रामस्थ, हॉटेल व्यवसायिक नेहमीच माणुसकीच्या भावनेतून मदतीसाठी तातडीने धावून  आल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे. या वळणार अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने  वळण काढून या ठिकाणी रस्ता सरळ करण्याची मागणी करण्यात आली आहे

Tag : satara,khabataki,truck,accident,18death,vijapur,karnatka,labour,