Tue, Mar 26, 2019 01:58होमपेज › Satara › खंबाटकी बोगद्याजवळ भीषण अपघातात १८ ठार(video)

खंबाटकी बोगद्याजवळ भीषण अपघातात १८ ठार (video)

Published On: Apr 10 2018 7:23AM | Last Updated: Apr 10 2018 12:49PMखंडाळा  : वार्ताहर

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्याच्या पुढील ‘एस’ आकाराच्या वळणावर कर्नाटक राज्यातून भोर येथे बांधकामासाठी मजूर वाहतूक करणार्‍या भरधाव आयशर टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात 18 जण ठार, तर 17 गंभीर जखमी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी मृतदेहांचा अक्षरश: खच पडल्याने वातावरण भेदरून गेले होते. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली व खंडाळा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,  सोमवारी (दि. 9) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून भोर येथे खोदकामासाठी कामगार निघाले होते. मालवाहतूक करणार्‍या या टेम्पोत (क्र. केए 37-6037) 35 पेक्षाही जास्त कामगार दाटीवाटीने बसले होते. तर त्यांच्याबरोबर दोन दुचाकीवर चार जण पाठीमागून निघाले होते. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास टेम्पो खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर  पुढे आला. अत्यंत धोकादायक एस कॉर्नरवर  चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगातील हा टेंपो रस्त्याच्या कडेला बांधलेल्या सहा फुटी संरक्षक कठड्याला जावून धडकला.

ही धडक एवढी भीषण होती की टेम्पोे संरक्षक कठ्यावर पलटी होवून पलिकडच्या  सेवा रस्त्यावर  जावून आपटला. तेथून पुढे फरफटत जावून पुन्हा तो उभा राहिला. यावेळी टेंपोतील मजूर अक्षरश: उलटे पालटे झाले. अनेकजण टेम्पोखाली चिरडलेही. त्यामुळे या मजुरांनी फोडलेल्या किंकाळ्यांनी परिसर भेदरून गेला. दरम्यान याच टेम्पोच्या पाठीमागून येणार्‍या त्यांच्याच टोळीतील दोघा दुचाकीस्वारांनी तत्काळ ही घटना खंडाळ्याला येऊन पोलिसांना सांगितली. पहाटेची वेळ असल्याने मदतकार्यात विलंब लागत होता. अंधारामुळे अडचणी येत होत्या.  मिळेल ती वाहने व रुग्णवाहिकेतून मृत  व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.  या अपघातात 18 जण ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत.

मृतामध्ये माधवी अनिल राठोड (वय45, रा.नागठाणे, ता. विजापूर), रेखु शंकर चव्हाण (55, रा. हडगली ता. विजापुर), संतोष काशिनाथ नायक (32, रा. हडगली ता. विजापुर), मंगलबाई चंदु नायक (42,  रा. हडगली, ता. विजापुर), कृष्णा सोनु पवार (60, रा. राजनाळतांडा ता. विजापुर), किरण विठ्ठल राठोड (15, रा.मदभाईतांडा ता. विजापुर), देवाबाई मोहन राठोड (27,  रा. मदभाईतांडा, ता. विजापुर), संगिता किरण राठोड (26, रा. मदभाईतांडा ता. विजापुर), देवानंद नारायण राठोड (35, रा. हिटनळीतांडा, ता. विजापुर), प्रियंका कल्लु राठोड (18, रा. मदभाई तांडा ता. विजापुर), तन्वीर किरण राठोड (दिड वर्ष, रा. मदभाईतांडा ता. विजापुर), विठ्ठल खिरु राठोड (40, रा. मदभाईतांडा, ता. विजापुर) , अर्जुन रमेश चव्हाण (30, रा.कुडगीतांडा ता. विजापुर), श्रीकांत बसु राठोड (38, रा. कुडगीतांडा ता. विजापुर), सिनु बासु राठोड (30, रा. कुडगीतांडा ता. विजापुर), मेहबुब राजासाब आतार (चालक- 55, रा. खादी ग्रामोद्योग पाठीमागे आलीका रोजा, विजापुर), माजीद मेहबुब आतार (25, रा. खादि ग्रामोद्योग पाठीमागे आलीका रोजा विजापुर), कल्‍लूबाई विठ्ठल राठोड (वय 35, रा. मदभाईतांडा, ता. विजापुर) हे अठरा जण जागीच ठार झाले.

जखमींमध्ये सुनिल विठ्ठल राठोड (05), सुनिल कल्लु राठोड(20) , चंदु गंगु नायक (60), विनोद कृष्णा पवार(22), जम्मीबाई राठोड (60, रा. सर्व विजापुर), वनिता पट्टु राठोड (15, रा.एल.टि.नं.1), रंबिता देवानंद राठोड(30, रा. हिटनळीतांडा, ता. विजापुर), काजल अनिल राठोड(05, रा. नागठाण ता. विजापुर), रोहित देवानंद राठोड(18,रा. हिटनळीतांडा ता. विजापुर), पुजा कित्तु राठोड (06, रा. उडातांडा, ता. विजापुर), एकनाथ चंदु राठोड (11, रा. हडगलीतांडा ता. विजापुर), शांताबाई रूपसिंग पवार (60, रा. हडगलीतांडा ता. विजापुर), सचिन फत्तु राठोड (18, रा. मदभाईतांडा ता. विजापुर), निकिता श्रीकांत राठोड (22, रा. कुडगीतांडा ता. विजापुर), शांताबाई रेखु चव्हाण (24, रा. हडगलीतांडा ता. विजापुर), विद्या श्रीकांत राठोड (दिड वर्ष, रा. कुडगीतांडा ता. विजापुर) , अनिल रेखु चव्हाण (24, रा. हडगलीतांडा ता. विजापुर) यांचा समावेश आहे. 

खंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात व शिरवळ येथील खासगी रुग्णालयात पाठविले तर स्थानिक ग्रामस्थ, खंडाळा रेस्क्यु टिम व पोलीसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघात घडल्यानंतर  काहि वेळातच जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पो. उपअधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे, तहसिलदार विवेक जाधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तर शिरवळचे पो.नि. भाऊसाहेब पाटिल, लोणंदचे स. पो.नि सोमनाथ लांडे यासह कर्मचार्‍यांनी वाहतूक सुरळीत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या  घटनेची फिर्याद चंद्रकांत रुपसिंग पवार यांनी दिली असुन अधिक तपास स.पो.नि. युवराज हांडे करित आहेत.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे-बेंगलोर महामार्ग हा देशातील सर्वात व्यग्र महामार्गांपैकी एक आहे.  त्यामुळे कर्नाटक व मुंबईकडून येणारी वाहने मोठ्या प्रमाणात असतात.  खंडाळा बोगदा पास केल्यानंतर एस वळणाचा घाट आहे. या टापूमध्ये गेल्या 15 वर्षांत शेकडो जण मृत्युमुखी पडले आहेत. तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक व प्रवाशांमधून वारंवार झालेली आहे. मात्र, याची कोणीच दखल घेतलेली नाही. मंगळवारी झालेला हा अपघात सर्वात भीषण होता. या अपघाताला जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.