Sun, Jul 21, 2019 05:46होमपेज › Satara › आगीत होरपळतंय फुलांचं गाव 

आगीत होरपळतंय फुलांचं गाव 

Published On: Jan 21 2018 2:55AM | Last Updated: Jan 20 2018 10:40PMसातारा : प्रतिनिधी

जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या कास पठारावर सध्या आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. कृत्रिम वणवे लावणार्‍यांत वन विभागाच्या कर्मचार्‍यांचीही चर्चेत येवू लागली आहेत. गेल्या दोन वर्षांत कास पठारावरील हंगामात अपेक्षेप्रमाणे फुलांचा बहर न आल्याने पठारावर आग लावण्याचे प्रयोग केले जात असल्याचे समोर आले आहे. वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडूनच असे उद्योग होवू लागले तर कास पठाराचे संवर्धन कसे होणार? असा सवाल पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे.

कास पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा 2012 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला. या पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणार्‍या विविध प्रकारच्या रानफुलांसाठीही आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. मोठी सोनकी,वायतुरा, पांढरा सापकांदा, सोमाडा, कंदील पुष्प किंवा कंदील खर्चुडी, मुसळी, भारंगी, डुक्कर कंद,  दीपकडी, दवबिंदू, गवती दवबिंदू, कासा, टूथब्रश ऑर्किड, छावर, उंद्री, अंजनी, अबोलिमा, नीलिमा, कुमुदिनी, निसुर्डी, काळी निसुर्डी, पिंड, पानेर, छोटी सोनकी, सोनकी,कवळा, कोंडल, सीतेची आसवे,हालुंडा, काटे रिंगणी अशा 30 हून अधिक विविध फुले कास पठारावर फुलतात. कास पठार म्हणजे जणू काही फुलांचंच गाव आहे. मात्र, या पुष्प पठाराला वन विभागाचीच नजर लागली. पर्यावरण प्रेमींकडून प्रचंड विरोध होत असतानाही या पठाराला कंपाऊंड घालून बंदिस्त करण्यात आले. या पठारावरुन फिरणार्‍या जंगली  प्राण्यांचा वावर कमी झाला. तोरेचे कुंपण अडचणीचे ठरले. त्याचबरोबरच फुलझाडे फुलण्यासाठी आवश्यक असलेली परागीकरणाची प्रक्रियाही थांबली. याचा विचार न करता वन विभागातील काही कर्मचार्‍यांनी या पठरावर वणवे लावण्याचे उद्योग सुरु केले आहेत. गेल्या दोन वर्षांत पठारावर  अपेक्षित फुलांचा हंगाम आला नाही. उशिरा आलेली फुले लवकर कोमेजून गेली. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून या फुलांच्या गावाला आग लावण्याचे प्रकार सुरु असल्याची चर्चा पठार परिसरातील गावांमध्ये आहे. पठार जाळल्यामुळे हंगाम लवकर सुरु होवून उशिरपर्यंत फुलांचा बहर राहिल, असा या कर्मचार्‍यांचा होरा आहे. वणवे लागवण्यात वन कर्मचारी असतील तर त्यांचा हा नादानपणा असल्याचे पर्यावरणप्रेमी मानत आहेत.