Wed, Jul 24, 2019 12:55होमपेज › Satara › गुर्‍हाळ घरांना अखेरची घरघर

गुर्‍हाळ घरांना अखेरची घरघर

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 8:14PMकराड : चंद्रजीत पाटील 

दिवसेंदिवस वाढणार्‍या भेसळीकडे शासनाचे दुर्लक्ष... मजुरांकडून होणारी फसवणूक... गुळाचा ढासळलेला दर... खर्च आणि मिळणार्‍या उत्पन्नातील तफावत यांचा न जुळणारा मेळ यासह अन्य काही कारणांमुळे कराड तालुक्यातील गुर्‍हाळ घरांना अखेरची घरघर लागली आहे. तालुक्यातील सुमारे 250 गुर्‍हाळ घरांपैकी सध्यस्थितीत केवळ 50 ते 60 गुर्‍हाळ घरे चालू आहेत. त्यामुळे आता शासनाचे डोळे केव्हा उघडणार ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सुमारे दीड टन ऊसापासून 170 ते 180 किलो गुळाचे उत्पन्न मिळते. सध्यस्थिती गुळाला 2 हजार 600 रूपयांपासून 3 हजार रूपयांपर्यंत दर मिळत आहे. याउलट गेल्यावर्षी यापेक्षा जास्त दर मिळत होता. त्यामुळेच सध्यस्थितीत दीड टनामागे ऊस तोडणी, वाहतूक, गुळ निर्मिती आणि त्यानंतर बाजारपेठेपर्यंतची गुळाची वाटचाल पाहता येणारा सर्व खर्च वजा करता 1 हजार रूपयेही शेतकर्‍यांच्या हाती पडत नाहीत. त्यामुळेच शेतकरीही गुर्‍हाळ घरांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भेसळीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

यापूर्वी कराड, कोल्हापूरचा गुळ आपली खास चव आणि गुणवत्तेसाठी देशभरासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्ध होता आणि आजही आहे. मात्र सध्यस्थिती परराज्यातून येणार्‍या साखरमिश्रीत गुळामुळे गुणवत्तापूर्ण गुळावर संंक्रात निर्माण झाली आहे. दर्जेदार गुळाच्या एका आदणासाठी सुमारे 800 ते 900 लिटर उसाचा रस लागतो. त्यामुळे असा गुळ निर्माण करण्यासाठी सुमारे 1700 ते 1800 रूपयांच्या आसपास खर्च येतो. 

मात्र साखर मिश्रित गुळ बनवण्यासाठी सुमारे 400 ते 450 लिटर उसाचा रस वापरला आणि नंतर साखर मिक्स करून तो गुळ निर्माण केला जातो. या गुळाला खर्चही कमी येतो आणि त्यामुळेच तो दर्जेदार गुळाच्या किमतीत विकणे सहजपणे परवडते.

भेसळीवर नियत्रंण ठेवणे शासनाचे विशेषत: अन्न आणि औषध प्रशासनाचे काम आहे. मात्र हा विभाग कधीच गुळ भेसळीवर ठोस कारवाई करत नाही. तसेच शासनही परराज्यातून आपल्या भागात येणारा भेसळयुक्त गुळ रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करत नाही.  

आरोग्यावरही घातक परिणाम

गुळ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, याची सर्वांनाच कल्पना आहे. मात्र भेसळमुक्त गुळामुळे केवळ सर्वसामान्यांची लूटच होते असे नाही, तर सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही अशा गुळाचे घातक परिणाम होतात, असा दावा कराड तालुका गुर्‍हाळ मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केला असून शासनाने त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

खर्च व उत्पन्नातील तफावत

सध्यस्थितीतील गुळाचे दर पाहता एक टन गुळामागे शेतकर्‍यांना 1 हजार रूपये मिळणेही अवघड होऊन बसले आहे. मशागत, उसाची लागवड, पाणी, विजेचा प्रश्‍न आणि येणारे बील अथवा पाणीपट्टी, खतांचा खर्च आणि या सर्वानंतर तोडणी, वाहतूक खर्च पाहता टनामागे दोन हजाराहून अधिक खर्च येतो. याशिवाय गुळ निर्मितीनंतर बाजारपेठेपर्यंतचा प्रवास वेगळाच आहे. मात्र अशा स्थितीत गुळाचे दर ढासळल्याने केवळ गुळासाठी केली जाणारी ऊस शेती न परवडणारी झाली आहे.

मजुरांमुळे मालक अडचणीत

गुर्‍हाळ घरांवर काम करणारे मजूर हे बहुतांशवेळा परजिल्ह्यातील असतात. अनेक मजूर मालकांचे पैसे बुडवतात. अनेकदा खोट्या गुन्ह्यात मालकांना अडकवले जाते. अशा प्रसंगात गुर्‍हाळ मालकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण, सहानभूती शासनाकडून अथवा प्रशासनाकडून मिळत नाही. अनेक प्रकरणात पैसे बुडवणार्‍या मजुरांनाच अभय मिळते आणि अगोदरच खर्च आणि दर यांचा ताळमेळ लागत नसलेलो गुळ धंदा अक्षरश: बंद करावा लागतो.