Tue, Jun 25, 2019 21:35होमपेज › Satara › चायनीज काकडीचा यशस्वी प्रयोग 

चायनीज काकडीचा यशस्वी प्रयोग 

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 8:06PMकराड : अशोक मोहने 

शेती परवडत नाही, अशी ओरड सुरू असताना कार्वे ता. कराड येथील सागर जाधव या युवकाने चायनिज काकडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. दीड एकरात तीन 
महिन्यात 22 लाख रूपयांचे घसघसीत उत्पन्न घेऊन ‘उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी’ हे दाखवून दिले आहे. कराड तालुक्यात शेतीत हा अनोखा प्रयोग ठरला आहे. पीक लागणीनंतर पहिल्या महिन्यात हवामानाने चांगली साथ दिली तर कोणत्याही हंगामात चायनिज काकडीचे उत्पादन घेता येते. मात्र अवेळी पाऊस, धुके यामुळे पीक हातचे जाण्याचा धोका असल्याने सर्रास शेतकरी या  पळ पिकाचे उत्पादन घेण्याचे धाडस करत नाहीत. पण सागरने हे शिवधनुष्य यशस्वी पेलेले. 

रासायनिक, सेंद्रिय खत टाकून शेतीची मशागत केली.अर्धी सरी करून पूर्ण ठिबक अंथरले. त्यावर मल्चींग पेपर टाकला. त्यानंतर उर्वरीत सरी करून घेतली. मल्चींग पेपरला तीन फुटावर होल पाडून त्यामध्ये एक- एक बी टोकले. औषध फवारणी आठवड्यातून दोन वेळा तर झाडाच्या व फळाच्या वाढीनुसार खत टाकले. बी टोकल्यानंतर तीस दिवसात फळ सुरू झाले. पुढे दोन महिने त्याचा हंगाम सुरू राहिला. दररोज तोडणी करूनही उत्पादन भरघोस निघाले. 

दोनशे ते अडीचशे ग्रॅम वजनाचे फळ पॅकिंग करून मुंबईला पाठविले. तीन महिन्यात तब्बल 22 लाख रूपयांचे उत्पादन मिळाले. पिज्जा, बर्गर यामध्ये चायनिज काकडीचा  वापर होतो. पंचतारांकीत हॉटेलमध्ये याची मोठी मागणी असते. चाळीस ते पन्नास रूपये किलोला भाव मिळाला.  एका किलोत साधारण चार काकड्या बसतात. तिसर्‍या महिन्यानंतर प्लॉट नवीन पिकांसाठी रिकामा होतो. 

त्यामुळे हे पीक शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे, अशी माहिती सागर जाधव यांनी दिली.