Sat, Jun 06, 2020 00:50होमपेज › Satara › ठराविक लोकांची मक्तेदारी महात्मा फुलेंनी मोडली : डॉ. जयसिंगराव पवार

ठराविक लोकांची मक्तेदारी महात्मा फुलेंनी मोडली : डॉ. जयसिंगराव पवार

Published On: Jan 19 2019 7:52PM | Last Updated: Jan 19 2019 7:43PM
कराड : प्रतिनिधी 

आपल्या भाषेत शब्दकोश, खंडकाव्य, इतिहासाचे ग्रंथ, चरित्र ग्रंथ, वाङ्‌मय किती आले यावर साहित्याचे मुल्यमापन होत असते. इतिहास व साहित्याला विषयांच्या मर्यादा नसल्या तरी साहित्यामध्ये मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळू शकला नाही, अशी खंत इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांनी क्रांती केल्याचे गौरवोद्‍गार डॉ. पवार यांनी काढले.

उंब्रज (ता. कराड) येथे त्रिवेणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, स्वागताध्यक्ष सुधाकर जाधव, सत्वशील पाटील, जयंत जाधव, सरपंच लता कांबळे, उपसरपंच अजित जाधव, प्रा. मच्छिंद्र संकटे, द. जाधव, आनंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पवार म्हणाले, साहित्यामध्ये बाराव्या, तेराव्या शतकात विवेक सिंधु व ज्ञानेश्वर यांची मराठी वेगळी आहे व ती साहित्य निर्मितीची सुरुवात आहे. साहित्याला मर्यादा नाहीत. साहित्यात संस्कृतीची उंची, जडणघडण यावरून साहित्य किती सरस आहे हे ठरते. साहित्यामध्ये ठराविक लोकांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम महात्‍मा जोतिबा फुले यांनी केले. त्यामुळे महात्मा फुले हे साहित्याच्या नजरेतून आद्य साहित्यकार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य आणि इतिहास सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम नाटककार, कादंबरीकार, टिव्ही सिरीयल वाले करतात. इतिहासकाराला स्वातंत्र नसते, इतिहासकार जे साहित्य लिहतो, तो साहित्यकार उजेडात आणतो. गावांचा इतिहास असतो तसा माणसांचा इतिहास असतो व या गावाच्या इतिहासात ज्ञान, विज्ञान आणि साहित्य यांचा त्रिवेणी संगम साहित्य संमेलनात झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संमेलनाचे उद्घाटक सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, कागद आणि लेखनी म्हणजे आपले साहित्य आहे. शब्दांचे उत्खनन करणे म्हणजे साहित्य होय. मनाचा, विचारांचा कांगोरा नाहिसा करून पटेल ते विचार मांडणे म्हणजे साहित्य होय. प्रचंड साहित्याचा खजिना असलेल्या कृष्णाकाठची  उंची वाढली पाहिजे, असे सांगून सहज सुचलेले हेच खरे साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्वागताध्यक्ष सुधाकर जाधव यांनी त्रिवेणी साहित्य संमेलनातून नवीन साहित्य चळवळ उभी राहिली असून, साहित्यामुळे उंब्रजला नवीन ओळख मिळाली असल्याचे सांगितले. साहित्याची चळवळ भावी पिढीला बळ देणारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी निमंत्रक प्रा.मच्छिंद्र संकटे, उपसरपंच अजित जाधव, आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.