Sat, Apr 20, 2019 08:13होमपेज › Satara › शपथपत्र दाखल करण्यास १७ महिने का लागले ? : आ. पृथ्वीराज चव्हाण

शपथपत्र दाखल करण्यास १७ महिने का लागले ? : आ. पृथ्वीराज चव्हाण

Published On: Jul 26 2018 5:01PM | Last Updated: Jul 26 2018 5:01PMकराड : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणावर 2012 पासून आम्ही तत्कालीन मंत्री खा. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची उपसमिती नियुक्त केली होती. या समितीने सखोल अभ्यास करून अहवाल सादर केला होता. मराठा समाजाची सध्यस्थिती, तसेच अन्य सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही 2014 मध्ये मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केले होते. त्यामुळे आमच्यावर घाईगडबडीत आरक्षण दिल्याचा केला जाणारा आरोप पूर्णपणे तथ्यहीन आहे, असा दावा करत युती शासनाला न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यासाठी 17 महिने का लागले ? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

मराठा समाजाचा विश्वास सरकारने गमावला आहे. शांततेत आंदोलन करूनही राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यासाठी चालढकल केली. शपथपत्र दाखल केल्यानंतर आता 100 वकील उभे करण्याची भाषा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील करत आहेत. मात्र यापूर्वीच असे का केले नाही? असे प्रश्न उपस्थित करीत राज्य शासन मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. मुख्यमंत्र्यांसह जबाबदार मंत्री बेताल वक्तव्य करीत आहेत. राज्याचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरला विठ्ठलपूजा करतात. त्यामुळे त्यांना पंढरपूरला जाता आले नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. साप सोडणे ही माहिती मुख्यमंत्र्यांना कोणी दिली, असा प्रश्न उपस्थित करत मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी हे वक्तव्य केले होते का? चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई होणार का? असे प्रश्न उपस्थित करत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे मत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.