Tue, Mar 19, 2019 05:43होमपेज › Satara › सातार्‍यात सुसाट जेसीबीचा थरार

सातार्‍यात सुसाट जेसीबीचा थरार

Published On: Mar 16 2018 3:52PM | Last Updated: Mar 16 2018 10:46PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील माची पेठेत शुक्रवारी दुपारी सुसाट जेसीबीने समोरून येणार्‍या व रस्त्यालगत पार्किंगमध्ये असणार्‍या 2 कार, 1 रिक्षा व 4 दुचाकींना चिरडले. खळबळ उडवून देणार्‍या या अपघातात दोन महिलांसह पाच जण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बे्रकफेल झाल्याने अपघात झाला असल्याचे जेसीबीचालकाचे म्हणणे आहे. 

वैजंता डोईफोडे (रा. गोविंदनगरी, कुंदन लोंढे रा.समर्थ मंदीर, सतीश मोरे रा.सातारा अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बोगद्याकडून जेसीबी क्रमांक एमएच 12 ईबी 1394 हा पोवई नाक्याच्या दिशेने निघाला होता. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जेसीबी माची पेठेतील अदालत वाड्यासमोर आला. यावेळी पुढील बाजूस तीव्र उतारा होता. जेसीबी भरधाव वेगात असतानाच त्याचा अचानक ब्रेक फेल झाला. या घटनेने जेसीबी वाहन चालकाचे जेसीबीवरील नियंत्रण सुटले व समोरुन येणार्‍या वाहनांना ठोकरत जेसीबी जात होता. या अपघातात जेसीबीने रिक्षा क्रमांक एमएच 11 एम 8391, कार एमएच 11 एके 4905, कार एमएच 12 केई 3704 या वाहनांसह चार दुचाकींना ठोकर दिली. यातील बहुतेक वाहने समोरुन निघालेली होती.

जेसीबी समोरुन अंगावर येत असताना पाहून दुचाकीवरील युवकांनी प्रसंगावधान राखत त्यावरुन थेट उड्या मारल्या. रिक्षा चालकाला व त्यामधील महिला प्रवासीला बाहेर पडता आले नाही, तर एक दुचाकीस्वार कारच्या पाठीमागे अडकून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. अवघ्या पाच मिनिटांत परिसराचा नकाशाच बदलून गेला एवढा भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर जखमींना तत्काळ अडकलेल्या वाहनांमधून बाहेर काढून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमल्यानंतर जेसीबीवरील चालकाला शोधण्याचा प्रयत्न केला. संतप्‍त जमाव त्याला मारहाण करणार एवढ्यात चालकाने अचानक बे्रक फेल झाल्याचे सांगितले. नागरिकांनी तत्काळ शाहूपुरी पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची परिस्थिती पाहिल्यानंतर पोलिसही हादरुन गेले. घटनास्थळाचा पंचनामा करुन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.