Fri, Mar 22, 2019 01:29
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › जवानाची २ लाखांची रोकड असणारी पिशवी लंपास

जवानाची २ लाखांची रोकड असणारी पिशवी लंपास

Published On: May 04 2018 4:26PM | Last Updated: May 04 2018 4:26PMसातारा : प्रतिनिधी

जकातवाडी (ता.सातारा) गावच्या हद्दीमध्ये दुचाकीस अडकवलेली दोन लाखांची रोकड असणारी पिशवी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. याबाबतची तक्रार भारतीय सैन्य दलात कार्यरत असणार्‍या विजय संपत देशमुख (रा.कारी, ता.सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

जवान विजय देशमुख हे भारतीय सैन्यात कार्यरत असून, सध्या त्यांची नेमणूक बिकानेर येथे आहे. गावी घर बांधायचे असल्याने त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियातून 3 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर देशमुख हे पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले. दि. 1 रोजी त्यांना कुटुंबियांनी फोन करून काम सुरू करायचे असल्याने गावी येण्यास सांगितले. त्यानुसार ते गावी परतले. दि. 3 रोजी बांधकामासाठीचे साहित्य खरेदी करायचे असल्याने आवश्यक पैसे काढण्यासाठी ते दुचाकीवरून सातार्‍यातील बँकेत आले. या बॅकेतुन दोन लाखांची रोकड काढल्यानंतर देशमुख हे पुन्हा कारीकडे निघाले होते. यावेळी जकातवाडीच्या हद्दीत आल्यानंतर दुचाकी थांबवून ते लघुशंका करण्यासाठी गेले असता, यावेळी त्यांनी दोन लाखांची रोकड असणारी पिशवी दुचाकीच्या हँडलला अडकवली होती. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुचाकीच्या हँडलला असणारी पिशवी ओढून पळ काढण्यास सुरूवात केली. यानंतर देशमुख यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते सापडले नाहीत. गुरूवारी रात्री देशमुख यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द तक्रार दिली असून, तक्रारीत चोरट्यांनी दोन लाखांची रोकड, बँक पुस्तक, ओळखपत्र असणारी पिशवी चोरून नेल्याचे म्हटले आहे.