Mon, Jan 21, 2019 04:42होमपेज › Satara ›   मी गुलमोहर बोलतोय..!

  मी गुलमोहर बोलतोय..!

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 8:57PMसातारा : सुनील क्षीरसागर 

निसर्गामध्ये अशी विविध रंगांची उधळण सुरू आहे. निळ्या आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर दिवसा उन्हाच्या प्रचंड काहिलीत तापल्या फुपाट्यावरून चालतानाही फुलांच्या  मैफिलीत वाट केव्हा सरून जाते हे समजतही नाही. अरे हो, पण माझ्याकडेही जरा पहा की... थोड्याच दिवसात माझे आगमन दिमाखात होणार आहे.  माझ्या आगमनानंतरच  सृष्टीतील खर्‍या रंगोत्सवाला बहार येते. एवढेच नाही तर केवळ माझ्यामुळेच निसर्गाचे वेगळे काव्यही सुरू होते. शाळा, कॉलेजातील पिकनिक आमची वस्ती असलेल्या ठिकाणीच शेरोशायरी करायला आणि हुंदडायला येतात. 

सातारा या ऐतिहासिक राजधानीत तर चक्क माझा दिवस (गुलमोहर डे) साजरा केला जातो त्यावेळी माझ्या अंगावर केवळ दिवसभरच लाली फुलत नाही तर अवघा वसंत संपेतोपर्यंत ही लाजरी छटा अंगाअंगातून भिरभरत असते. 

सातार्‍यातील गुलमोहर डे दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन त्यानिमित्ताने होते.  शाळा-कॉलेजातील मुले, कला  शाखेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तांबड्या रंगांनी  मोहरलेलं माझं रूप चितारण्यासाठी वेडे होतात. अनेकजण  त्यामध्ये वेगळे रंग भरून माझा दिमाख वेगळ्या रूपात साजरा करतात.  त्यावेळी मला मात्र अंगातून मोहरल्यासारखं वाटतं. माझा दिवस संपतो आणि सूर्योदयाला माझ्या सावलीखाली  चक्क गुलमोहरांच्या फुलांचा सडा पडलेला असतो! होय, मी गुलमोहर बोलतोय..!