Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Satara › ऐतिहासिक कमानी हौद दुर्दशेच्या गर्तेत

ऐतिहासिक कमानी हौद दुर्दशेच्या गर्तेत

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 8:52PM

बुकमार्क करा
सातारा : सुशांत पाटील

ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या सातार्‍यातील गड, किल्‍ले, ऐतिहासिक स्थळे शूरविरांच्या शौर्यगाथेची ओळख करुन देतात. मात्र, सध्या सातार्‍यातील ऐतिहासिक वास्तूंची दूरवस्था होत चालली आहे. छत्रपती आप्पासाहेब भोसले यांच्या काळात बांधलेल्या ‘कमानी हौदाची’ देखील  पालिकेच्या दुर्लंक्षामुळे दुर्दशा झाली आहे.  या हौदाचा परिसर अस्वच्छ झाल्यामुळे इतिहास प्रेमींकडून याबाबत नाराजी व्यक्‍त होत आहे. 

छत्रपती आप्पासाहेब महाराज यांच्या काळात नागरिक व जनावरांच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून राजपथावर इ.स 1840 मध्ये ‘कमानी हौद’  बांधण्यात आला. या हौदामध्ये अदालत वाड्याच्या पाठीमागे असलेल्या नागझर्‍यातून थेट पाईपलाईन होती. मात्र नंतरच्या काळात इमारती वाढल्यामुळे कमानी  हौदाला नागझर्‍यातून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. नंतर सातार्‍यात नगरपालिका झाल्यानंतर तेथे कमानी हौदाजवळ मोठी टाकी बांधून तेथे पाणीपुरवठा केला जाई. 2001 साली पालिकेतर्फे या हौदाचे सुशोभिकरणही करण्यात आले होते.  मात्र त्यानंतर काही वर्षानंतरच या ऐतिहासिक वास्तूकडे पालिकेचे  दुर्लंक्ष झाले.

आता कमानी हौदामध्ये अस्वच्छता पसरली आहे. परिसरात असलेल्या चहाच्या टपर्‍यांचे ग्लास, प्लॅस्टिक पिशव्या, कागदे दिसून येतात. परिसरातील काही व्यावसायिक खरकटे तेथेच टाकतात. त्यामुळे तेथे लावलेली झाडेही सुकत आहेत.

कमानी हौदाच्या परिसरात झाडे वाढली आहेत. त्यामुळे तेथील बाकड्यावर नागरिकांना बसता येत नाही.  बाकडे धूळखात पडलेली आहेत. हौदामध्येही अस्वच्छता पसरली आहे. परिसरात गवत वाढले आहे. कमानी हौदाकडे पालिकेचेे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी तेथे फिरकणे बंद केले आहे.  पालिकेच्या दुर्लंक्षतेमुळे शहरातील अशी ऐतिहासिक स्थाने दुर्दशेच्या 
गर्तेत सापडली आहेत.