Sun, Apr 21, 2019 05:47होमपेज › Satara › सातारा हिल हाफ मॅरेथॉनवर इथिओपियाचा झेंडा

सातारा हिल हाफ मॅरेथॉनवर इथिओपियाचा झेंडा

Published On: Sep 02 2018 2:36PM | Last Updated: Sep 02 2018 2:35PMसातारा : प्रतिनिधी

 जगभरात आगळ्यावेगळ्या हिल हाफ मॅरेथॉनमुळे प्रसिद्ध झालेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या ७ व्या पर्वात यंदाही इथिओपियाच्या धावपटूंनी पुरुष व स्त्री गटात प्रथम क्रमांक पटकावला. २०१२ साली सातार्‍यासारख्या निमशहरामध्ये दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या धर्तीवर सातारा हिल हाफ मॅरेथॉनची संकल्पना सातारा येथील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. संदीप काटे यांनी मांडली. गेली सहा वर्षे सातारा हिल हाफ मॅरेथॉनची लोकप्रियता संपूर्ण जगभरामध्ये पसरलेली आहे. 
आज सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या सातव्या पर्वामध्ये सुमारे ६ हजार पुरुष-महिला धावपटू सहभागी झाले होते.  यामध्ये परदेशातूनही काही धावपटूंनी सहभाग घेतला होता. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला. 

२१ किलोमीटरच्या हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या सिकियास अबात याने १ तास ७ मिनिटे ५७ सेकंदात अंतर पार करुन पुरुष गटात (इलाईट ओपन) प्रथम क्रमांक पटकावला. इथिओपियाच्याच आँडिलॉडिल्यू मॅमोने १ तास ९ मिनिट व १४ सेकंदात दुसरा, तर केनियाच्या जॉन सेलेल ने १ तास १० मिनिटे आणि २७ सेकंदात हाफ मॅरेथॉन पूर्ण करुन तिसरा क्रमांक पटकावला.

इलाईट ओपन स्त्री गटात इथिओपियाच्या अबिबेज गेला हिने १ तास २० मिनिटे आणि १ सेकंदात हिल हाफ मॅरेथॉनचे २१ किलोमीटरचे अंतर पार करुन प्रथम क्रमांकावर नाव कोरले. केनियाच्या पास्कालिया चिपकोगेल हिने १ तास २१ मिनिटे आणि ३२ सेकंदात अंतर पार करत दुसरा क्रमांक पटकावला, तर इथिओपियाच्या मेसरेट बिरु हिने १ तास २२ मिनिटे आणि १७ सेकंदात २१ किमीचे अंतर पार करुन तिसरा क्रमांक मिळवला.

भारतीय पुरुष गटात २१ किलोमीटरमध्ये मांढरदेव (ता. वाई) येथील आदिनाथ भोसले याने १ तास १७ मिनिटे ९ सेकंदात हिल हाफ मॅरेथॉनचे अंतर पार करुन प्रथम क्रमांक पटकावला. तर खिंडवाडी, ता. सातारा येथील स्वप्नील सावंत याने १ तास १७ मिनिटे १९ सेकंदात अंतर पार करुन दुसरा क्रमांक पटकावला. तसेच पालघर येथील काशिनाथ गोरे यांनी १ तास १८ मिनिटे व ४१ सेकंदात २१ किमीचे अंतर पार करुन तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

भारतीय महिला गटामध्ये पुण्याच्या मनिषा साळुंखे यांनी १ तास ३५ मिनिटे व ३२ सेकंदात २१ किलोमीटरचे अंतर पार करुन प्रथम क्रमांक, प्रियंका चावरकर यांनी १ तास ३६ मिनिटे १० सेकंदात अंतर पूर्ण करुन दुसरा क्रमांक तर दरवर्षी महिला गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावणार्‍या मांढरदेव येथील जनाबाई हिरवे हिने १ तास ३७ मिनिटे आणि ५६ सेकंदात २१ किलोमीटरचे अंतर पार करुन तिसरा क्रमांक मिळवला. 

सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर हलगी आणि तुतारीच्या निनादात सुमारे ६ हजार स्पर्धक यवतेश्‍वरच्या दिशेने मार्गस्थ झाले. राजपथावरुन राजवाडा, यादोगोपाळ पेठ, समर्थ मंदिरमार्गे स्पर्धकांचा जथ्था यवतेश्‍वरच्या दिशेने धावू लागला. या स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी हजारो सातारकर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते. यावेळी अनेक सामाजिक संस्थांनी रस्त्याच्या बाजूला स्टॉल लावून स्पर्धकांना मोफत एनर्जी ड्रिंक, पाणी, चॉकलेट्स पुरवत होते. टाळ्या, घोषणा आणि जल्लोषाने हिल हाफ मॅरेथॉनचा संपूर्ण मार्ग उत्तेजित झाला होता. २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटरच्या या रनमध्ये अबालवृद्धांनी आपला सहभाग नोंदवला.  संपूर्ण मार्गावर पोलिस व वाहतूक यंत्रणेच्या कर्मचार्‍यांनी चोखपणे नियोजन केले होते. सातार्‍यातील वैद्यकीय व्यवसायिकांनी खबरदारीचे उपाय म्हणून रुग्णवाहिकाही तैनात केल्या होत्या. सकाळपासूनच सातारा शहरातील वातावरण या स्पर्धेच्या निमित्ताने भारावून गेले होते. काल सकाळपासूनच हिल हाफ मॅरेथॉनमधील स्पर्धक सातार्‍यात पोहोचले होते. 

नांगरे पाटील, कृष्ण प्रकाशही धावले

नुकत्याच युरोपातील आयर्नमॅन स्पर्धेमध्ये भारताचा झेंडा फडकाविणारे १९९८ च्या बॅचचे विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश हे दरवर्षीप्रमाणे आजही सातारा येथील हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्यांनीही कमी वेळात २१ किलोमीटरचे अंतर पार करुन सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये पदक मिळविले. तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील हे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावले. त्यांनीही २१ किलोमीटरचे अंतर पार केले. या दोघा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या सहभागामुळे सातारा पोलिसही भलतेच चार्ज झाले होते. सातारा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांनीही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.