Thu, Apr 25, 2019 13:53होमपेज › Satara › उच्च शिक्षितांचाही सैन्य भरतीकडे कल 

उच्च शिक्षितांचाही सैन्य भरतीकडे कल 

Published On: Dec 13 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 10:49PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी 

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी नोकर्‍यांवर गंडांतर आल्याने युवकांचा ओढा स्पर्धा परिक्षांकडे वाढला आहे. तर कमी शिक्षण व देशसेवा करण्याची इच्छा असणारे पोलिस व सैन्य भरतीमध्ये आपले नशीब आजमावत आहे. यामध्ये आता उच्च शिक्षितांचीही भर पडली आहे. 10 वी व 12 वीसोबत आता अभियंते व पदवीधारकही सैन्य भरतीकडे करिअरच्या दृष्टीने पाहू लागले आहेत. 

सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे देशात सातार्‍याची चांगली प्रतिमा आहे. काही दिवसांपासून सातार्‍यात सैन्यभरती सुरू आहे. या भरतीमध्ये 61 हजाराहून अधिक युवक येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. त्यानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधूदुर्ग, गोवा येथून मोठया प्रमाणात युवकांनी भरतीला प्रतिसाद दिला. अजूनही भरतीची प्रक्रिया सुरू आहे. करिअरच्या दृष्टीने ही भरती सुवर्णसंधी असल्याचे मानण्यात येते. फिजीकल, मेडिकल आणि लेखी दिल्यानंतर नोकरी पक्की समजली जाते. 

भरतीला 12 वी पास व शारिरीकदृष्ट्या सक्षम या दोनच पात्रता असल्या की बास होतात. त्यामुळेच भरतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदा मात्र, चित्र उलटे दिसत आहे. 12 वी पास असणार्‍यांसोबत उच्च शिक्षीत असणार्‍यांचीही संख्या मोठी आहे. करिअर घडवण्यासाठी भरतीमध्ये प्रत्येक जण धाव घेताना दिसत आहे. सरकारी व खासगी नोकर्‍यांमध्ये गडांतराची तलवार लटकत असल्याने हा निर्णय युवकांना घ्यावा लागत आहे. 

यामध्ये पदवीधर, इंजिनिअर झालेल्या युवकांची संख्या मोठी आहे. भरतीमध्ये सन्मान, नियमित पगार, कौटुंबिक सुविधा व इतर सवलतीमुळे ही नोकरी युवकांना शाश्‍वत वाटते. म्हणूनच युवकांची सैन्यभरतीकडे मोठया प्रमाणात आकर्षण वाढले आहे. त्यामुळे पूर्वी पोलिस किंवा सैन्य भरतीमध्ये जा आणि नोकरी कर असा समज होता. त्यावेळी याकडे फारसे कोणी गांभीर्याने घेत नव्हते. मात्र, आता काळ बदलल्याने उच्च शिक्षितही याकडे चांगली संधी म्हणून पाहू लागले आहे. 

ही भरती सातत्याने निघत असल्याने यामध्ये वारंवार प्रयत्न केल्यास एकदा तरी चान्स लागेल, अशी आशा युवकांना आहे. तसा प्रयत्न केल्यानंतर अनेक जण यामध्ये यशस्वी झालेले आहेत. भरतीच्या अनुशंघाने हजारो युवकांनी अकॅडमी जॉईन केली आहे. या माध्यमातून भरतीसाठी तयारी करत आहे. त्यामुळे आता भरतीमध्येही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.