Tue, May 21, 2019 12:09होमपेज › Satara › राष्ट्रवादी-शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये रंगणार ‘सामना’

राष्ट्रवादी-शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये रंगणार ‘सामना’

Published On: May 25 2018 11:36PM | Last Updated: May 25 2018 11:07PMसातारा : प्रतिनिधी

जिहे-कठापूर योजनेला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांनी केली आहे. तर या योजनेचे शिल्पकार ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव द्यावे, असे जोरदार समर्थन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनी केले. खटाव तालुक्यातील भाजप पदाधिकार्‍यांकडून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव या योजनेला देण्याची मागणी होत आहे. योजनेला कोणाचे नाव द्यायचे यासाठी आ. शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी बैठकीत केली. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस-शिवसेना विरुद्ध भाजप असाच ‘सामना’ पाहायला मिळणार आहे.

कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयात जिहे-कठापूर योजनेच्या कामांची आढावा बैठक पार पडली. बैठकीस आ. शशिकांत शिंदे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष  नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे प्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी चार वर्षांत आलेल्या निधीची माहिती घेण्यात आली. झालेला खर्च आणि पूर्ण झालेली कामे यांचीही माहिती पदाधिकार्‍यांनी घेतली. रखडलेल्या कामांस किती निधी लागणार यावरही चर्चा झाली. त्यावेळी या योजनेच्या नामांतराचा मुद्दा पुढे आला. दोन्हीही नेत्यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांचा खास शैलीत समाचार घेतला. 

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, आठ महिन्यांच्या जलसंपदा मंत्रीपदाच्या कालावधीमध्ये तीन महिने आचारसंहितेमुळे काम करता आले नाही. तरीही नेर (ता. खटाव) येथील आजूबाजूच्या गावांना जिहे-कठापूर योजनेचे पाणी मिळावे, यासाठी 1 कोटी सर्वेक्षणासाठी मंजूर केले. सध्या पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय केला जात असून भाजप सरकार सूडबुद्धीने वागत आहे. वंचित भागांना न्याय द्यावा, यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न करुन कृष्णा लवादाच्या माध्यमातून 81 टीएमसी पाण्यावर हक्क सांगितला. सध्या जलयुक्त शिवार अभियानातून बंधारे बांधले जात आहेत. पण 5 वर्षांत त्यातील गाळ न काढल्यास पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती आ. शिंदे यांनी व्यक्त केली.  

नरेंद्र पाटील म्हणाले, कोणताही राजकीय फायदा झाला नसतानाही  शिवसेनाप्रमुखांनी 1995 साली कृष्णा खोर्‍याची निर्मिती केली. त्यामुळे त्यांचे नाव जिहे-कठापूर योजनेला द्यावे. छ. शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला कोणाचाही विरोध नाही. परंतु, भाजपने लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. मुळात इनामदार यांचा या योजनेशी काडीमात्र संबंध नाही. मोदींना गुरूदक्षिणा द्यायची असेल तर गुजरातमधील नर्मदा प्रकल्पाला इनामदारांचे  नाव  द्यावे.  त्यामुळे सेनाप्रमुखांचे नाव देण्यासाठी आ. शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही पाटील यांनी केली.  

विजय घोगरे म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळासाठी 1 हजार कोटींचे बजेट आहे. परंतु, आर्थिक अनुशेष व इतर कामासाठी पुरेसा निधी मिळाला नाही तरीही पंतप्रधान कृषी योजनेतून महाराष्ट्रातील 26 योजनांपैकी सातारा 5, सोलापूर व सांगलीतील प्रत्येकी एका योजनेला निधी मिळणार आहे. 1995 साली 250 कोटींच्या योजनेला मंजुरी मिळाली. सध्या ही योजना 1025 कोटींपर्यंत पोहोचली आहे. यंदा 30 कोटी रुपयांची तरतूद झाली असून डिसेंबर 2019 पर्यंत पंप हाऊस, पाईपलाईन व रेल्वे क्रॉसिंग पाईपलाईन अशी तांत्रिक कामे पूर्ण केली जाणार आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या 16 संचालकांनी प्रस्तावाला मान्यता दिली असून एका संचालकाची परवानगी अंतिम टप्प्यात असल्याचे घोगरे यांनी सांगितले. कामाचा तपशील देत त्यांनी  समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे तात्पुरता संघर्ष टळला. 
बैठकीला जि. प. सदस्य प्रदीप विधाते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव, दिनेश देवकर, भानुदास कोरडे, संजय घोरपडे, राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, पं. स. सदस्य संतोष साळुंखे, राजेंद्र कचरे व जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता संजय बोडके, अधिकारी उपस्थित होते.