होमपेज › Satara › 'गावाकडच्या गोष्टी’ आल्‍या यू ट्यूबवर

'गावाकडच्या गोष्टी’ आल्‍या यू ट्यूबवर

Published On: Mar 08 2018 5:17PM | Last Updated: Mar 08 2018 5:24PMसुशांत पाटील : सातारा

आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या गावाला, गावाकडच्या माणसांना व्हावा, गावाचा, आपल्या सातार्‍याचा लौकिक वाढावा या उद्देशाने सातार्‍यातील नितीन पवार या युवा दिग्दर्शकाने  कोरी पाटी प्रोडक्शच्या माध्यमातून ‘गावाकडच्या गोष्टी’ ही मालिका यू ट्यूबवर सुरू करुन सोशल जगतावर नुसता धुमाकूळ घातला आहे. सातारच्या अस्सल ग्रामीण संस्कृतीचं मांडलेले वर्णन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून, ते आता सातासमुद्रापार पोहचल्याने त्यांच्या टीमचे सर्वच स्तरातून कौतुक  होत आहे.

चार बुकं शिकलं म्हणजे अनेकांना गावच्या पाठीचा डोंगर वृध्द वाटतो. गावातील माणसं अडाणी वाटतात. त्यामुळेच ते गावाला विसरात आणि शहराची वाट धरतात. मात्र युवा दिग्दर्शक व लेखक नितीन पवार यांनी आपल्या शिक्षणाचा गावाला फायदा व्हावा, गावातील बेरोजगार तरूणांचा नावलौकिक व्हावा, त्‍यांना रोजगार मिळावा यासाठी त्यांच्या जीवनाचे वास्तव कोरी पाटी प्रोडक्शनच्या टीमने अत्यंत हुबेहूब असे रेखाटले आहे.  त्यांना निर्माते सुदाम पवार, एडिटर सचिन नाटेकर के.टी.पवार व  सातार्‍यातील ग्रामीण भागातील कलाकार व वरची केळेवाडी ता. पाटण येथील ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच या गावाकडच्या मालिकेचे भाग महाराष्ट्राबरोबर सर्वत्र पोहोचले. या मालिकेतील सर्व कलाकार हे ग्रामीण भागातील आहेत. 

डिजिटल युगात होणारी क्रांती समोर ठेवून या टीमने अत्यंत कमी खर्चात ‘गावाकडच्या गोष्टी’ या मालिकेची रचना केली. ही मालिका नोव्हेंबर 2017 साली सुरू झाली असून, या मालिकेला रसिकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतले आहे. या मालिकेचे एकूण 25 भाग  बनवण्यात आले असून, आतापर्यंत या मालिकेचे 17 भाग संपलेले आहेत. 

आज अनेकजण आपले गावाकडचे घरदार सोडून मुंबईला जात आहेत. अनेकांना शेती व्यवसाय करणे म्‍हणजे कमीपणाचे वाटत आहे. मात्र शहरात पोटासाठी वार्‍यागत पळणार्‍या मात्र चेहर्‍यावर कुठेही समाधान नसलेल्या लोकांना ‘गावाकडे चला’ व गावात बदल करा असा संदेश देणारी ही ‘गावाकडच्या गोष्टी’ ही मालिका असून, अल्पावधितच रसिकांच्या मनात ही घर करू लागली आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर परदेशात स्‍थायीक झालेल्‍या मराठीजनांकडूनही ‘गावाकडच्या गोष्टी’ ला पसंती मिळू लागली आहे.

या मालिकेत के.टी.पवार, संतोष राजेमहाडिक, अविनाश पवार, तृप्ती शेडगे, रेश्मा साळवी, कुमार सुतार, नाना चक्के, समाधान पिंगळे, आदिती देवर्शी आदी  प्रमुख कलाकारांनी भूमिका साकारल्‍या आहेत.

गावाला आहेरातून मिळणार उजेड

‘गावाकडच्या गोष्टी’ तील आव्या आणि माधुरी यांच्या लग्नाच्या आहेरातून सामाजिक संदेश देण्याचा कोरी पाटी प्रोडक्शच्या टीमने एक अफलातून प्रयत्न केला आहे. ठोसेघरनजिक डोंगरकपारीत असलेले तळदेव मायणी  हे गाव अजूनही अंधारात चाचपडत आहे. या गावाला सौर किट मालिकेतील लग्नाच्या आहेरातून देण्याचे प्रयत्न मालिकेची टीम करत आहेत.

बापू, अश्शील हाय अश्शील !

जगाच्या कानाकोपर्‍यात आपण गावाकडचे भन्नाट किस्से आठवणीत ठेवत असतो. कोरी पाटी प्रोडक्शनमुळे गावाकडचे अत्यंत यथार्थपणे रेखाटलेले डायलॉग आता घराघरात पोहचले आहेत. त्यात प्रमुख कलाकार के.टी.पवार  उर्फ बापूचा बापू, अश्शील हाय अश्शील ! हा डायलॉग आता प्रत्येकाच्या तोंडात बसला आहे. त्याचबरोबर संत्याचा आपल्या प्रेयसीबाबतचे प्रेम व्यक्त करणारा डायलॉग म्हणजे शेवटी ‘सुर्की ती सुर्कीच’ तसेच आपल्या प्रियकराला टोमणा मारणारा ‘लोकांच्या गाड्या धुण्यापेक्षा स्वत:ची म्हस धुतेलेली कधीपण चांगलं ’ असे कितीतरी डॉयलॉग सध्या सोशल मीडियाच्या केंद्रस्थानी आहेत.

अन् गावाकडची पोरं बनली सिनेस्टार !

गावात राहणारी पोरं ज्याना सिनेमाचा ‘स’माहिती नाही, ती पोरं आज कोरी पाटी प्रोडक्शनच्या ‘गावाकडच्या गोष्टी’ या यू ट्यूब चॅनेलमुळे प्रकाशझोतात आली आहेत. आपल्या उत्कृष्ट अभियानातून त्यांनी महाराष्ट्राबरोबर बाहेर राहणार्‍या प्रेक्षकांचीही मने जिंकली आहेत. या पोरांना आता मोठमोठ्या कार्यक्रमांना सिनेस्टार म्हणून बोलावणे येऊ लागल्याने हे सर्वच कलाकार जाम खूष आहेत.