Thu, Jul 18, 2019 20:43होमपेज › Satara › खून प्रकरणात न्यायालयाचीच फसवणूक; तिघांवर गुन्हा

खून प्रकरणात न्यायालयाचीच फसवणूक; तिघांवर गुन्हा

Published On: Jul 24 2018 2:34PM | Last Updated: Jul 24 2018 2:34PMसातारा : प्रतिनिधी

तडीपार गुंड कैलास गायकवाड याच्या खूनकरणी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी कैलास पिटेकर हा अल्पवयीन असल्याचा त्याच्या कुटुंबियांचा दावा फोल ठरला आहे. शाहूपुरी पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुध्द न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईने अल्पवयीन मुलांना पुढे करुन गैरकृत्य करणार्‍यांना मोठा हादरा बसला आहे.

कैलास शंकर पिटेकर, सर्जेराव शंकर पिटेकर आणि शंकर लक्ष्मण पिटेकर (सर्व रा.नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) या तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी खुद्द पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ जुलै रोजी कैलास गायकवाड या तडीपार असलेला गुंडाचा अर्कशाळेजवळ खून झाल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर परिसरासह शहरात खळबळ उडाली होती. तडीपार गुंडाचा खून कैलास पिटेकर याने केला असल्याचा आरोप मृत कैलास गायकवाड याच्या कुटुंबियांनी करत त्याला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते. शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे गतीमान करुन कैलास पिटेकर याच्यासह त्याच्या आणखी एका साथीदाराला ताब्यात घेतले. कैलास पिटेकर हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्यासह कुटुंबियांनी केल्याने पोलिसांसमोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. 

संशयित अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आल्याने पोलिसांनी 10 दिवसापूर्वी त्यानुसार कारवाई केली. मात्र पोनि किशोर धुमाळ यांनी याचा पाठपुरावा करुन कागदोपत्री माहिती घेतली असता कैलास पिटेकर हा अल्पवयीन नसल्याचे समोर आले. अखेर त्यानुसार सोमवारी रात्री पोलिस ठाण्यात त्याच्यासह एकूण तिघांवर गुन्हा दाखल केला.