Wed, Nov 21, 2018 01:14होमपेज › Satara › दत्ता जाधवच्या घराची झडती

दत्ता जाधवच्या घराची झडती

Published On: May 13 2018 2:18AM | Last Updated: May 13 2018 2:18AMसातारा : प्रतिनिधी

मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेला गुंड दत्ता जाधव याला काही दिवसांपूर्वी प्रतापसिंहनगरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी दत्ता जाधव याच्या घराची तब्बल 3 तास झडती घेतली. यावेळी दत्ता जाधव यालाही सोबत घेण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला होता. 

प्रतापसिंहनगरात राहणार्‍या दत्ता जाधव याच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, मोक्का लागल्यापासून दत्ता जाधव हा पसार होता. सातारा पोलिस शोध घेत जत तालुक्यातील प्रतापपूर येथे पोहोचल्यानंतर दत्ता जाधव तेथूनही नाट्यमयरीत्या पसार झाला होता. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी सातारा, सांगली पोलिसांवर तुफान दगडफेक व पोलिस व्हॅनची तोडफोड केली होती. जत येथील घटनेने सातारा पोलिसांसमोर दत्ताला अटक करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

यानंतर आठवडाभरापूर्वी पोलिसांनी दत्ता जाधव याला प्रतापसिंहनगर येथून सापळा रचून अटक केली. तेथेच पोलिसांची गाडी बंद पडल्याने पोलिसांनी दत्ता जाधव याची वरात काढली. यानंतर दत्ता जाधव याला न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दत्ता जाधव याच्याविरोधात संघटित गुन्हेगारी आणि  खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात सबळ पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्री जाधव याच्या घराची झडती घेतली. या झडतीवेळी जाधव यालाही सोबत घेण्यात आले होते. घराच्या झडतीसोबत नागरिकांकडे चौकशीही करण्यात आली.

या झडतीमध्ये सातारा पोलिस उपविभागीय अधिकारी खंडेराव धरणे, एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट, वडूजचे पोनि यशवंत काळे यांच्यासह शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सहभाग घेतला होता.