Fri, Apr 26, 2019 18:17होमपेज › Satara › डमी बसवून बनला सहायक कर निरीक्षक

डमी बसवून बनला सहायक कर निरीक्षक

Published On: Mar 23 2018 10:30PM | Last Updated: Mar 23 2018 10:15PMसातारा : प्रतिनिधी

राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) 2016 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला डमी विद्यार्थी बसवून कर सहायक निरीक्षकपद मिळवणार्‍या गोविंद बळीराम चेंबोले (रा. धाणोर बुद्रुक, ता. उंबरी, जि. बीड) तसेच त्याला मदत करणार्‍या नरसाप्पा शिवहार बिराजदार (रा. किल्लारी, लातूर) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याची तक्रार राज्य लोकसेवा आयोगाचे उपसचिव सु. ह. अवताडे यांनी दिली असून सातार्‍यात एमपीएससीचा घोटाळा झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

परीक्षेसाठी गोविंद चेंबोले याने अर्ज भरला होता. अर्ज भरल्यानंतर त्याला परीक्षेसाठी नांदेड केंद्र देण्यात आले होते. नांदेड येथील केंद्र गैरसोयीचे असल्याचे कारण सांगत चेंबोले याने सातार्‍यातील आण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे केंद्र विनंतीवरून घेतले. त्यानुसार 28 जून 2016     रोजी या परीक्षेचा पेपर झाला. चेंबोले हा पेपर स्वत: देण्यासाठी न येता त्याने नरसाप्पा शिवहार बिराजदार याच्या मदतीने डमी विद्यार्थी बसवला.परीक्षा दिल्यानंतर या परीक्षेत चेंबोले हा उत्तीर्ण झाला. उत्तीर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करुन तो माझगाव (मुंबई) येथील वस्तु  व सेवा कर भवनात निरीक्षक म्हणून रुजू झाला. सुमारे महिन्यापुर्वी एका गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलिसांनी चेंबोले याच्यासह काहीजणांना अटक केली होती. चौकशीत त्याने कर सहाय्यक निरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी डमी बसवल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती नंतर पोलिसांनी लोकसेवा आयोगाला दिल्यानंतर खळबळ उडाली. चेंबोले याने कुठल्या केंद्रावर परीक्षा दिली त्याची माहिती संकलित करण्यात आली.

चेंबोले याच्या चौकशीत बिराजदार याचे नाव पुढे आले. बिराजदार यानेच डमी विद्यार्थी परीक्षेस बसवण्यास मदत केल्याचे सांगितल्यानुसार मुंबई पोलिसांनी त्यालाही अटक केली.  सातारा येथे डमी उमेदवार बसवला गेल्याने  याची तक्रार आयोगाचे उपसचिव सु. ह. अवताडे यांनी गुरुवारी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली असून चेंबोले, बिराजदार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पोरे करत आहेत.

दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून घोटाळा झाल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे. सातारसारख्या ठिकाणी डमी विद्यार्थी बसवून हे कृत्य झाल्याने त्याबाबत आश्‍चर्य होत आहे.

Tags : satara, fri, charg,dummy, student, set up, mpsc examination,