होमपेज › Satara › 'मराठीच्या ‘अभिजात’ दर्जासाठी पूर्ण ताकद लावणार' 

'मराठीच्या ‘अभिजात’ दर्जासाठी पूर्ण ताकद लावणार' 

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:16PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

मराठीच्या ‘अभिजात’ दर्जासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे,अशी ग्वाही केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिली. दरम्यान, या आश्वासनामुळे लवकरच मराठीला अभिजात दर्जा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मसापच्यावतीने चळवळ सुरु करण्यात आली आहे. 26 जानेवारीपूर्वी पंतप्रधानांकडून ठोस आश्वासन न मिळाल्यास पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वीकारले आहे.  गुरुवारी यासंदर्भात केंद्रीय भुपृष्ठ, वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची आ. शिवेंद्रराजे भोसले आणि मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी त्यांनी वरील ग्वाही दिली. मुंबई येथे या बैठकीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी खास वेळ राखून ठेवला होता. आ.शिवेंद्रराजे भोसले, मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या शिष्टमंडळाने या प्रस्तावाबाबतची सर्व माहिती ना. गडकरी यांना दिली. त्यात  आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे गरजेचे असून 11 कोटी जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही गेले वर्षभर प्रयत्न करत असल्याचे सांगितले.  

प्रा. मिलिंद जोशी यांनी पंतप्रधानांना  यासंदर्भात मसाप, शाहुपुरी शाखा आणि सातारा जिल्हयातून 1 लाख पत्रे पाठवण्यात आली आहेत. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड येथूनही यासंदर्भात पंतप्रधानांना पत्रे पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे आपण तातडीने पुढाकर घेऊन पाठपुरावा करावा अशी मागणी केली.

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यासंदर्भात आपण पूर्ण ताकतीने प्रयत्न करु. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पूर्ण ताकद लावू अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. शिष्टमंडळात मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, मसाप पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, डॉ. सचिन जाधव, सुरेंद्र वारद यांचा समावेश होता.