Mon, Apr 22, 2019 06:36होमपेज › Satara › दाभोलकर, ‘त्यांना’ माफ  करायचं नाही...

दाभोलकर, ‘त्यांना’ माफ  करायचं नाही...

Published On: Aug 20 2018 12:04AM | Last Updated: Aug 19 2018 11:41PMसातारा : प्रतिनिधी

अंधश्रध्दा निर्मृलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुणे येथे भल्या सकाळी हत्या झाली होती. या घटनेने साताराच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरुन गेला. डॉ.दाभोलकर गेल्याची बातमी सकाळी सकाळी  झोपेतून उठताच कानावर पडल्याने अवघं जनजीवन सैरभर झालं होतं. शांततेच्या आभाळात ‘ठोऽऽ’ असा आवाज आला आणि त्या आवाजाने आख्खा महाराष्ट्र हादरून गेला. गेली पाच वर्षे महाराष्ट्र या दु:खातून सावरलेला नाही. 

‘त्या’ दिवशी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉ. दाभोलकर उठले. ते  फ्रेश होवून मॉर्निंग वॉकसाठी संभाजी उद्यानामध्ये फिरायला गेले होते. उद्यानामध्ये फिरुन परत पुन्हा पायी जात असताना 7 वाजून 20 मिनिटांनी ते ओंकारेश्‍वर पुलाजवळ आल्यानंतर इथेच त्यांचा घात झाला. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अचानक बेसावध असलेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यावर फायरिंग केले. एकूण 5 गोळ्या डॉ. दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आल्या. यातील दोन गोळ्या चुकल्या मात्र तीन गोळ्या त्यांना लागल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण पडले. फायरिंगच्या घटनेनंतर हल्लेखोर दुचाकीवरुन भेकडासारखे पळून गेले. घटनास्थळीचे भयावह दृश्य पाहणारे सुन्न झाले होते. पहिली पंधरा ते वीस मिनिटे नेमक्या कोणावर गोळ्या झाडल्या, ती व्यक्ती आहे तरी कोण? हे समजत नव्हते. मात्र ते डॉ.नरेंद्र दाभोलकर असल्याचे समोर आल्यानंतर समाजमन्न सुन्न झाले. घटनास्थळी पुणे पोलिसांनी धाव घेवून सर्व परिसर तपासाच्या दृष्टीने सीलबंद केला. घटनास्थळासह परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज घेवून दुचाकी व हल्लेखोरांची माहिती घेण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.

सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाईच झाली नाही. सुमारे दोन वर्षे उलटल्यानंतर मात्र डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे सुपुत्र डॉ.हमीद दाभोलकर हे मुंबई उच्च न्यायालयात गेले व हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सी.बी.आय.) सोपवण्याची विनंती केली. त्यानंतर या घटनेचा तपास सीबीआयकडे गेला.