Mon, Apr 22, 2019 23:54होमपेज › Satara › यादोगोपाळ पेठेत मिठाईच्या दुकानात राडा

यादोगोपाळ पेठेत मिठाईच्या दुकानात राडा

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:21PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात गजबजलेल्या यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिराजवळ दोन युवकांनी अक्षरश: धिंगाणा घालत मिठाईचे दुकान दगड, फरशी घालून फोडले. तसेच दुकानातील फ्रीजसह साहित्याची तोडफोड करुन दहशत माजवली. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, तोडफोडीचे नेमके कारण समजू शकले नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, गोल मारुती मंदिरासमोर मिठाईचे दुकान आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक संशयित युवकांनी फरशी, दगड उचलून ते दुकानाच्या काचांवर मारले. या घटनेने परिसरातील वाहतूक ठप्प झाली तर दुकानातील कामगार घाबरुन गेले. संशयित युवकांनी त्यानंतर दुकानातील फ्रीजसह इतर साहित्याची तोडफोड करुन तो फ्रीज रस्त्यावर फेकून दिला.

अवघ्या पाच मिनिटात राडा केल्यानंतर संशयित युवक दुचाकीवरून पसार झाले.  परिसरात पसरल्यानंतर बघ्यांची गर्दी उसळली. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तोडफोड करणारे युवक व घटनेच्या कारणाची माहिती रात्री उशीरापर्यंत पोलिस घेत होते.