Wed, Mar 27, 2019 05:58होमपेज › Satara › जिल्ह्यात भूजल पातळीत कमालीची वाढ 

जिल्ह्यात भूजल पातळीत कमालीची वाढ 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने लहान मोठी धरणे भरली. तसेच जलयुक्त शिवार अभियानाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरले गेले. त्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील 106 विहिरींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये भूजल पातळीत सुमारे 1 मीटरने वाढ झाल्याचे दिसून आले. खटाव, महाबळेश्‍वर, वाई व जावली तालुक्याची भूजल पातळी  समाधानकारक आहे.

गेल्या  2 ते 3 वर्षांपूर्वी पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत कमालीची घट झाली होती. यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी, नाले, ओढे भरभरून वाहू लागले.गावागावातील तलाव, बंधारे भरले गेले.तसेच गावोगावी जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात पाणी साठवून ठेवण्यास मदत झाली.त्यामुळे बहुतांश गावातील विहिरी तुडूंब भरल्या आहेत. माण व खटाव तालुक्यात पावसाळ्यातही टँकरने पाणी पुरवठा  सुरू होता मात्र परतीचा पाऊस मोठया प्रमाणात झाल्याने सर्व टँकर बंद झाले.

जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील 106 विहिरींची पाणीपातळी तपासणी केली. जावली तालुक्यातील एका विहिरीची 0.69 मीटरने पाणी पातळी वाढली आहे. कराड तालुक्यातील 15 विहिरीपैकी 12 विहिरींची पाणी पातळी  0.27 मीटरने तर 3 विहिरीमध्ये भूजल पातळीत घट आहे.खंडाळा तालुक्यातील 5 विहिरींपैकी 3 विहिरींची पाणी पातळी  0.05 मीटरने तर 3 विहिरीमध्ये भूजल पातळीत घट  आहे.

खटाव तालुक्यातील 17 विहिरीपैकी 13 विहिरींची पाणी पातळी  0.88 मीटरने तर 4 विहिरीमध्ये भूजल पातळीत घट आहे. कोरेगाव तालुक्यातील 9 विहिरींपैकी 6 विहिरींची पाणी पातळी 0.32 मीटरने तर 3 विहिरीमध्ये भूजल पातळीत घट  आहे. माण तालुक्यातील 16 विहिरींपैकी 9 विहिरींची पाणी पातळी  0.34  मीटरने तर 7 विहिरींमध्ये भूजल पातळीत घट  आहे. महाबळेश्‍वर तालुक्यातील 3 विहिरींची पाणी पातळी 0.82 मीटरने वाढली आहे.पाटण तालुक्यातील 10 विहिरींपैकी 8 विहिरींची पाणी पातळी  0.34  मीटरने वाढली तर 2 विहिरींमध्ये भूजल पातळीत घट आहे.

फलटण तालुक्यातील 12 विहिरींपैकी 7 विहिरींची पाणी पातळी  0.36 मीटरने तर 5 विहिरींमध्ये भूजल पातळीत घट आहे. सातारा तालुक्यातील 10 विहिरींपैकी 9 विहिरींची पाणी पातळी  0.59 मीटरने वाढली तर एका विहिरीमध्ये भूजल पातळीत घट  आहे. वाई तालुक्यातील 8  विहिरींपैकी 5 विहिरींची पाणी पातळी  0.74  मीटरने तर 3 विहिरींमध्ये भूजल पातळीत घट आहे.

निरीक्षण केलेल्या विहिरीतील  पाण्याच्या पातळीतील कमी अधिक वाढ व पर्जन्यमानातील झालेला फरक यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. तसेच पाण्याच्या भूजल पातळीत 0 ते 1 मीटरने वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे भुजल सर्वेक्षण  आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू वैज्ञानिक बी.आर.टोणपे यांनी सांगितले.