Fri, May 29, 2020 18:13होमपेज › Satara › चुकीच्या बिलांची सक्‍तीने वसुली

चुकीच्या बिलांची सक्‍तीने वसुली

Published On: Sep 18 2019 1:44AM | Last Updated: Sep 17 2019 8:09PM

संग्रहित छायाचित्रसातारा : प्रतिनिधी

सर्वसामान्य वीज ग्राहकांना चुकीची व अतिरिक्त रकमेची वीज बिले देऊन ती सक्तीने व मनमानी पध्दतीने वसूल करण्याची मोहिमच जिल्ह्यात सुरू असल्याचे दिसत आहे. चुकीच्या वीज बिलाबाबत ग्राहकांनी चौकशी केली असता, फॉल्टी मीटर चे कारण पुढे केले जात आहे. यावरुन महावितरणच्या कारभाराचा फॉल्ट प्रकर्षाने चव्हाट्यावर येत आहे. वीज बिल थकल्यास तात्काळ कनेक्शन तोडले जात असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यातील हजारो वीज ग्राहकांना गेल्या अनेक महिन्यांपासून चुकीची बिले दिली जात आहेत. याबाबत संबंधीत अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता मीटर फॉल्ट असल्याचे कारण सांगून हात झटकण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक महिन्यात बिलावर वेगवेगळी रक्कम बघून वीजग्राहक मात्र बुचकळ्यात पडले आहेत. महावितरणचे वसुली अधिकारी मनमानी पध्दतीने वीज बिल वसूल करत आहेत. बिल न दिल्यास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. मीटरमध्ये फॉल्ट असल्याने तपासणी करुन घ्या, असे सांगितले जात आहे. मात्र, मीटर तपासणीसाठी महावितरण कंपनीचा कर्मचारी पाठवला जात नाही. त्यामुळे ग्राहकांना खासगी वायरमनकडून तपासणी करावी लागते. तेथेही ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. 

आर्थिक वर्षात शंभर टक्के वसुली करण्याचा विडा उचललेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांनी ग्राहकांची अक्षरशः लूट केल्याचा आरोप होत आहे. चुकीची बिले आली असताना ग्राहकांना सहकार्य करण्याऐवजी तेवढीच रक्कम सक्तीने वसूल केल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत.