सातारा : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या बंदला राजधानी सातार्यासह जिल्ह्यातील प्रमुख शहरे, उपनगरे व ग्रामीण भागात कडकडीत प्रतिसाद मिळाला. अवघं जनजीवन मराठामय होऊन गेले. आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाभर एकच उठाव झाला अन् ‘एक मराठा, लाख मराठा’च्या गजराने अवघा जिल्हा दणाणून गेला. बाजारपेठा, एस. टी. सेवा, वडाप, रिक्षा वाहतूक, शाळा- महाविद्यालये पूर्णपणे बंद राहिल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले.
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवारी बंदची हाक देण्यात आली होती. राजधानी सातार्यात या बंदला उत्स्फूर्त व कडकडीत प्रतिसाद मिळाला. सातारा शहर व उपनगरांमध्ये सकाळपासूनच चिडीचूप वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी घराबाहेर पडणेच टाळले. राजधानीत मराठा बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. सर्व मराठे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलनासाठी एकत्र आले होते. त्यांनी बंदबाबत कोणतेही आवाहन केले नसतानाही राजधानीतील नागरिक, व्यापारी, व्यवसायिक, वाहतूकदार, पेट्रोलपंपचालक आदींनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.
रस्ते ओस पडले, महामार्ग तर कधी नव्हे तो स्तब्ध झाला. जिकडे तिकडे कमालीची शांतता जाणवत होती. सकाळी 7 वाजल्यापासून शहर व परिसरातील सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. शहरातील पोवई नाका, राजवाडा, बसस्थानक परिसर, करंजे पेठ, राधिका रोड, खालचा रस्ता, मोती चौक, विसावा नाका, गोडोली, शिवराज चौक येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट जाणवत होता. नेहमी गजबजूून जाणार्या ठिकाणी चिटपाखरूही फिरकत नव्हते. त्यामुळे जणूकाही अघोषित संचारबंदी असल्यासारखे वातावरण राजधानीत निर्माण झाले होते.
उपनगरातील कोडोली, संभाजी-नगर, विलासपूर, प्रतापसिंहनगर, कृष्णानगर, संगम माहुली या भागातील रस्ते ओस पडले होते. आनेवाडी येथील टोलनाका मोकळा मोकळा वाटत होता. तालुक्याच्या ग्रामीण भागातही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने गावगाडाही ठप्प झाला होता.
राजधानी सातार्यासह जिल्ह्यातील कराड, वाई, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, खंडाळा, जावली, पाटण, महाबळेश्वर या सर्वच तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. मराठा आरक्षणासाठी या सर्वच तालुक्यात उठाव झाला. ‘एक मराठा लाख मराठा, जय शिवाजी जय भवानी, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण द्या नाहीतर खुर्ची खाली करा’, आदी घोषणांनी अवघा जिल्हा दणाणून गेला होता. दरम्यान, जिल्हाभर शांततेत आंदोलन झाल्याने पोलिसांसह प्रशासनाने सुस्कारा सोडला.
अत्यावश्यक सेवा सुरू
राजधानी सातार्यासह अवघ्या जिल्ह्यात कडकडीत बंद असताना जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा देणारी मेडिकल्स, हॉस्पिटल्स मात्र सुरू होती. खुल्या असणार्या या अत्यावश्यक सेवांबाबत आंदोलकांची कोणतीही तक्रार दिसून आली नाही.