Fri, Apr 26, 2019 17:48होमपेज › Satara › डीजी साहब, सताराको और एक पोलिस थाना दिजीए 

डीजी साहब, सताराको और एक पोलिस थाना दिजीए 

Published On: Apr 24 2018 10:30PM | Last Updated: Apr 24 2018 10:13PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

महाराष्ट्राचे  पोलिस महासंचालक (डीजी) सतीश माथुर आज सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. शहराची लोकसंख्या विचारात घेतल्यास सातारकरांना आणखी एका पोलिस ठाण्याची नितांत गरज आहे. याशिवाय पोलिस कर्मचार्‍यांच्या वसाहतीचा प्रलंबित असलेला प्रश्‍न, खात्यांतर्गत फौजदार पदाची रेंगाळलेली यादी असे अनेक प्रश्‍न आहेत. दै. ‘पुढारी’ने याबाबत वेळोवेळी पोलिसांच्या व्यथा मांडल्या आहेत. आज राज्याच्या पोलिस दलाचे सर्वोच्च अधिकारी सातार्‍यात येत असल्याने ‘डीजी साहब, सताराको एक और पोलिस थाना दिला दो’, अशी मागणी सातारकरांमधून केली जात आहे.
सातारा जिल्हा पोलिस दलामध्ये यापूर्वी सुमारे आठ वर्षापूर्वी पोलिस महासंचालक पी.एस.पसरीचा आले होते. त्यांच्यानंतर आता सतीश माथुर हे पोलिस महासंचालक सातारा नगरीत येणार आहेत. यंदा पोलिस दलाच्यावतीने पोलिस पब्लिक स्कूल सुरु करण्यात आल्याने त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. याशिवाय पोलिस दलात महिला पोलिसांची लक्षणीय संख्या असल्याने काम करत असताना त्यांच्या लहान पाल्यांना पोलिस दलाच्यावतीने पाळणाघर सुरु केले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतेक पोलिस ठाणी ‘स्मार्ट’ झालेली आहेत. राज्याच्या पोलिस दलासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याने स्मार्ट पोलिस ठाण्याची प्रमाणपत्रे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते दिली जाणार आहेत. अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस ‘स्टार’ पासून वंचित 

गृह विभागाच्या अंतर्गत फौजदारकीच्या परीक्षेतील पात्र उमेदवारांची यादी गेल्या चार वर्षापासून पेंडींग आहे. वयाच्या पन्नाशीमध्ये अभ्यास करुन फौजदारकीच्या परीक्षेत पास झालेल्या पोलिस विद्यार्थ्यांना ‘स्टार’पासून वंचित रहावे लागत असल्याने गृह विभागाचा उफारटा कारभार सुरु असल्याची भावना पोलिसांमधूनच व्यक्त होत आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये पार पडलेल्या या परीक्षेत लाखो पोलिस उमेदवारांनी अभ्यास करुन घवघवीत यश मिळवले. राज्यातून सुमारे 6 हजार पोलिसदादा या परीक्षेत पास झाल्याने व आपण आता फौजदार झाल्याने पोलिस दलातच एकूण आनंदाचे वातावरण होते. गृह विभागानेही पास झालेल्यांची पहिली यादी प्रसिध्द केली व तत्काळ त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. दुसर्‍या यादीला मात्र कमालीचा विलंब लावला गेल्याने पोलिसांना पदापासून वंचित राहण्याची वेळ आली. दै.‘पुढारी’ने याबाबत वेळोवेळी पोलिस कर्मचार्‍यांच्या व्यथा मांडल्या. त्यामुळे आतापर्यंत दोन याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत. अद्यापही अनेक पोलिस उत्तीर्ण झालेले असून त्यांना फौजदार पदापासून वंचित रहावे लागले आहे. अनेक पोलिस फौजदारविना निवृत्त झाले असून बहुतेकजण निवृत्तीच्या वाटेवर आहेत. यामुळे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी प्रलंबित फौजदार प्रकरणाचा निपटारा करावा, अशी अपेक्षाही पोलिसांमधून व्यक्त होत आहे.

अडीच लाख लोकसंख्येला 250 पोलिसांचा पहारा

सातारा शहराची सुमारे अडीच लाख एवढी लोकसंख्या असून या लोकसंख्येसाठी सातारा शहर व शाहूपुरी ही दोनच पोलिस ठाणी कार्यरत आहेत. शहर पोलिस ठाण्याचे विभाजन होवून शाहूपुरी पोलिस ठाण्याची साडेतीन वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2014 मध्ये निर्मिती झाली आहे. लोकसंख्येची तुलना केल्यास या दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांची संख्या उणीपुरी 250 एवढीच आहे. अडीच लाख लोकसंख्येच्या तुलनेतील कायदा व सुव्यवस्था संभाळण्यासाठी असणार्‍या पोलिसांच्या संख्येचा हा रेशो अतिशय तोकडा आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात 2017 मध्ये वर्षाला 950 तर शाहूपुरी पोलिस ठाण्यात 550 एवढे गुन्हे दाखल झाले असून अशाप्रकारे दरवर्षी दोन्ही पोलिस ठाण्यात मिळून सुमारे 1500 गुन्हे (सीआर) दाखल होत असल्याचे वास्तव आहे. दरम्यान, नुकत्याच ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थे’नुसार गुन्हे दाखल होण्यामध्ये देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागल्याचे रेकॉर्ड आहे. सातारा शहराचा उपनगराच्या माध्यमातून वेगाने विस्तार वाढत आहे. लोकसंख्येची दिवसेंदिवस वाढ होत असताना कायदा व सुव्यवस्था संभाळणार्‍या पोलिसांची संख्या मात्र तेवढीच राहिली. शाहूपुरी पोलिस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर सातार्‍यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल व गुन्हे दाखल होण्याची संख्या घटेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. यामुळेच सातारा शहराला आणखी एका पोलिस ठाण्याची गरज असून एमआयडीसी पोलिस ठाणे किंवा सदरबझार पोलिस ठाण्याची निर्मिती होणे अत्यावश्यक बनले आहे. एमआयडीसी पोलिस ठाणे झाल्यास महामार्गाच्या खालचा भाग त्या पोलिस ठाण्याला जोडला जाईल. शहर पोलिस ठाण्यासाठी मधली हद्द राहिल व उर्वरीत वरील भाग सद्यस्थितीनुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे राहिल. यामुळे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी सातारकरांच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक पोलिस ठाणे निर्माण करावे, अशी अपेक्षा सातारकरांची आहे.

पोलीस वसाहतीला लागल्या घुशी

सातारा जिल्हा पोलिस दलासाठी शहरात तीन ठिकाणी वसाहती आहेत. सिटी पोलिस लाईन, बी ग्राउंड व गोळीबार मैदान. या तिन्ही वसाहतींची जागा पोलिसांसाठी मोक्याच्या ठिकाणी व ऐसपैस आहे. दुर्दैवाने मात्र या तिन्ही ठिकाणच्या इमारतीची दूरवस्था भीषण आहे. सिटी पोलिस लाईन व बी ग्राउंड येथील इमारती सुमारे 80 ते 90 वर्षांपूर्वीची आहे. यामुळे यातील बहुतांशी घरांची पडझड झालेली असून या दोन्ही ठिकाणच्या परिसराला बकाल स्वरुप आलेले आहे. याशिवाय रस्त्यांची चाळण झालेली असून शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत. गटारे उघडी असून त्यामध्ये पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. घुशी- उंदरांनी या जागेला वेढल्याने घरे पोखरलेली आहेत. उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची टंचाई होत असल्याने पोलिसांच्या कुटुंबांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पडझडीमुळे पावसाळ्यामध्ये घरे गळत असल्याने राहण्यासाठी पुरेशी जागाच वापरासाठी मिळत नसल्याचे वास्तव आहे. पाण्याची पाईपलाईन घाणीमध्ये असल्याने आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या मुलांसाठी खेळणी आहेत. मात्र त्यालाही गंज लागला असून ती अडगळीत गेलेली आहेत. गेल्या दोन वर्षापासून पोलिस वसाहत होणार असे गाजर दाखवले जात आहे. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. इमारत होणार म्हणून पोलिसांना वसाहती खाली करण्याचे आदेशही झाले आहेत. यामुळे हक्काची वसाहत नसल्याने पोलिसांसमोर राहण्याचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. खासगी ठिकाणी राहण्यासाठी भरघोस भाडे द्यावे लागत असल्याने पोलिस कर्मचार्‍यांचे कुटुंब अस्थिर बनले आहे. पोलिस वसाहतीबाबत वेळोवेळी प्रस्ताव सादर झालेले आहेत. वसाहत बांधली जाणार म्हणून पोलिसांना खोल्याही रिकाम्या करायला लावल्या आहेत. आतापर्यंत पोलिस वसाहतीचे उद्घाटन व्हायला पाहिजे होते. पोलिस वसाहतीसाठी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. यामुळे सातार्‍यातून बदली होण्यापूर्वी त्यांच्याच उपस्थितीत पोलिस वसाहत इमारतीचे भूमिपूजन व्हावे, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. यामुळे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी सातारच्या पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्‍न निकालात काढून गोड गिफ्ट द्यावी, अशी मागणी होत आहे.