सातारा : प्रतिनिधी
प्रतापसिंहनगर, सातारा येथील दत्तात्रय रामचंद्र जाधव याच्यासह त्याच्या टोळीवर सातारा शहरातील शेतजमिनीचा विषय मिटवून घेण्यासाठी 16 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम तथा मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईने सातार्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. सातार्याच्या गुन्हेगारी निर्मूलनाचा विडा उचलणार्या जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांचा धडाका अजूनही सुरूच असल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
दत्ता जाधव, चंद्रकांत विष्णू सावंत, मंगेश चंद्रकांत सावंत (तिघे रा. सातारा) व इतर 8 ते 10 अनोळखी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात ग्रे रंगाची इनोव्हा 302 या कारचा वापर झाला असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राजकुमार जाधव (रा. पुसेगाव) हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. जाधव यांचा मेहुणा सर्जेराव दत्तू माने यांची सातारा येथील वनवासवाडी व संगमनगर येथे वडिलोपार्जित 5 एकर शेतजमीन आहे. या शेतजमिनीच्या वाटपाबाबत जाधव यांचा भाचा हरिश्चंद्र सर्जेराव माने यांनी सातारा येथे दिवाणी न्यायालयात एक दावा दाखल केला आहे.
तक्रारदार राजकुमार जाधव यांचे मेहुणे सर्जेराव माने व त्यांच्या दोन बहिणी यांच्या नावावरील एकूण 75 गुंठे क्षेत्र संशयित आरोपी चंद्रकांत सावंत याने तक्रारदार यांचे मेहुणे सर्जेराव माने व त्यांच्या बहिणींच्या सह्या फसवून घेऊन गीताबाई झंवर, जयंत गोविंद ठक्कर (रा.सातारा) यांच्या नावाने कुलमुखत्यारपत्र केले आहे. शेतजमिनीच्या या विषयावरुन न्यायालयात दावा सुरु असून सर्जेराव माने यांना केसमधील काही समजत नसल्याने फिर्यादी राजकुमार जाधव व त्यांचा भाचा हरिश्चंद्र माने हे या खटल्याचे काम पाहत आहेत.
सातार्यातील याच शेतजमिनीच्या विषयावरुन ऑक्टोबर 2017 मध्ये दुपारी संशयित आरोपी मंगेश सावंत याने तक्रारदार राजकुमार जाधव यांच्या पुसेगाव येथील घरात घुसून जागेच्या कारणातून शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेनंतर सुमारे 12 ते 13 दिवसांनी दुपारी संशयित आरोपी दत्ता जाधव, चंद्रकांत सावंत, मंगेश सावंत व इतर अनोळखी 8 ते 10 जण 302 या स्कॉर्पिओसह अन्य वाहनातून पुसेगाव येथे आले होते. राजकुमार जाधव यांना संशयितांनी सिध्दनाथ पतसंस्थेजवळ सेवागिरी ट्रेडर्स दुकानासमोर बोलावून घेतले. ‘सातार्यातील शेतजमिनीचे सुरु असलेले कोर्टमॅटर मिटवून घेण्यासाठी तक्रारदार यांना 16 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही संशयितांनी दिली.
याबाबतची तक्रार पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यातील टोळी चालक दत्ता जाधव व त्याच्या टोळीतील इतर सहकार्यांनी कोर्टमॅटर मिटवण्यासाठी पैसे मागून ते पैसे न दिल्याने घरात घुसून स्वत:च्या टोळीच्या फायद्याकरता तक्रारदार यांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पुसेगाव पोलिस ठाणेचे सपोनि एस. ए. गायकवाड यांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुसेगाव पोलिसांनी दत्ता जाधव याच्या टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला असता त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दत्ता जाधव याच्यावरील या मोक्काचा पुढील तपास कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे करणार आहेत.
मोक्कातील आरोपींना मदत करणार्यांना सहआरोपी करणार
सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मोक्काचा धडाका लावला असतानाच यातील बहुतांश संशयित आरोपी पसार झाले आहेत. यामुळे मोक्कातील संशयित आरोपींना कोणी आश्रय दिला किंवा पळून जाण्यास मदत केल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करून सहआरोपी करणार आहे
- संदीप पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख
tags : satara, satara news, datta jadhav, crime,case register under mocca