Tue, Sep 25, 2018 00:43होमपेज › Satara › 'तुमची मुलगी खूप आवडते, ती मला द्या..नाहीतर’..जाधवने दिली धमकी

सातारा : गुंडाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार;गुन्हा दाखल

Published On: May 31 2018 12:43PM | Last Updated: May 31 2018 12:44PMसातारा  : प्रतिनिधी 

प्रतापसिंह नगरमधील कुख्यात गुंड दत्ता जाधव याने एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पुणे येथील लॉजवर नेऊन अत्याचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या या कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला असून याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली असून सध्या गुंड दत्ता जाधव मोक्कामध्ये अटकेत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तेरा वर्षीय मुलीच्या आईला 'तुमची मुलगी खूप आवडते, ती मला द्या, मला दिली नाही तर तिला दुसऱ्या कोणाला मिळून देणार नाही, तिला बरबाद करेन,' अशी धमकी दिली. डिसेंबर २०१७ मध्ये पीडित मुलगी शाळेत जात असताना कारमध्ये बसवून तिला कपडे खरेदी करायला पुणे येथे नेले.

पुण्यातील एका लॉजवर तिच्यावर तीन वेळा अत्याचार केला.  या घटनेत ती मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. याची माहिती कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.