Thu, Aug 22, 2019 04:14होमपेज › Satara › मोक्का, तडीपारीत 375 जणांची ‘विकेट’

मोक्का, तडीपारीत 375 जणांची ‘विकेट’

Published On: Jul 29 2018 9:44AM | Last Updated: Jul 29 2018 9:44AMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दोन वर्षांच्या कालावधीत एकूण 13 टोळ्यांना मोक्का लावला असून यामध्ये टोळीप्रमुखांसह 130 जणांचा समावेश आहेे. मोक्काचा ठोका टाकत असतानाच दुसर्‍या बाजूने 166 जणांना तडीपार केले असून 79 जणांकडून सुधारणा करणार असल्याचे बाँड (शपथपत्रे) लिहून घेतले आहेत. अशाप्रकारे एकूण 375 गुन्हेगारांवर मोक्का, तडीपारअंतर्गत कारवाई करुन गुंडांची ‘विकेट’ त्यांनी घेतली आहे. दरम्यान, याशिवाय अतिशय क्लिष्ट असणारा वाई हत्याकांड प्रकरण, गुंतागुंतीचे खून, दरोडा, जबरी चोरी यांचाही प्रभावीपणे त्यांनी छडा लावलेला आहे.

एसपी संदीप पाटील यांनी सातारा जिल्ह्याचा जून 2016 मध्ये कार्यभार स्वीकारला. दोन वर्षाच्या कालावधीत सातार्‍यातील गुन्हेगारांचे ते कर्दनकाळ ठरलेले आहे. सावकारी हा थंड डोक्याने सातारा शहरासह जिल्ह्यात असल्याने त्यांनी मूळावरच घाव घालण्याचे ठरवले. यासाठी एसपी संदीप पाटील यांनी दर महिन्यात होणार्‍या क्राईम मिटींगमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना विशेष सूचना देवून मोक्का, तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले. ज्या गुन्हेगारावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत त्याची लिस्ट तयार करुन दोन वर्षांत एखादा- दुसरा गुन्हा दाखल झाला की त्याचा ते स्वत: प्रस्ताव तयार करण्यासाठी सूचना करुन पाठपुरावा करत होते.

या माध्यामातून एसपी संदीप पाटील यांनी 2016-17 मध्ये 9 तर 2017-18 मध्ये 4 टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत गुन्हे दाखल केले. मोक्काअंतर्गत लावण्यात आलेल्या टोळीप्रमुखांमध्ये प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर, महेंद्र तपासे, अमित उर्फ सोन्या देशमुख, आकाश खुडे, आशिष जाधव, अनिल कस्तुरे, चंद्रकांत उर्फ चंदर लोखंडे, अमित उर्फ बिर्‍या कदम यांची प्रमुख नावे आहेत. यातील काही जणांवर दोन मोक्का लावूनही कारवाई करण्यात आली आहे.

दोन वर्षांतील या धडाकेबाज मोक्का व तडीपारीच्या कारवाईमुळे गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे. अर्थात एसपी संदीप पाटील यांची ही कारवाई अजूनही सुरुच होती. सध्या मोक्काचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नव्हता. मात्र, तडीपारीसाठी एकूण 335 जणांचे प्रस्ताव समोर आले होते. त्यातील 166 जणांना तडीपार केले तर 79 जणांकडून शपथपत्र लिहून कारवाई करण्यात आली. यामुळे उर्वरीत अद्याप 90 जणांचे तडीपारीचे प्रस्ताव प्रलंबित असून त्यांची सुनावणी सुरु आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात दोन वर्षांत अनेक गुंतागुंत असणार्‍या घटनाही घडल्या आहेत. यामध्ये नुकताच पाचगणी-महाबळेश्‍वर येथे भरदिवसा झालेला खून, उंब्रज येथील दरोडा टाकून झालेला खून, माण-खटाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा झालेला खून असे अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. गंभीर घटना, दुर्घटना घडल्यानंतर एसपी संदीप पाटील हे स्वत: घटनास्थळी जावून तेथे तळ ठोकून पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना तपासाच्या सूचना देत होते.

दरम्यान, सुरुचि राडा झाल्यानंतर अबाधिक राखलेला कायदा व सुव्यस्था. चिंचणेर-वंदन येथे दंगल झाल्यानंतर परिस्थिती चिघळू न देता वेळीच थोपवण्यात आलेला प्रसंग व नुकताच मराठा क्रांती मोर्चा झाल्यानंतर स्वत: महामार्गावर जावून जमावाला केलेले शांततेचे आवाहन. यामुळे अशा अनेक गंभीर परिस्थितीही त्यांनी नियोजनबध्दरीत्या हाताळली आहे.