Mon, Jun 17, 2019 15:12होमपेज › Satara › नगरसेवक बाळू खंदारेला कोठडी

नगरसेवक बाळू खंदारेला कोठडी

Published On: Mar 06 2018 10:46PM | Last Updated: Mar 06 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

सुरुची बंगल्याबाहेर झालेल्या राड्याप्रकरणी नगरसेवक बाळू खंदारे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 7  दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी लॉकअप गार्डमध्ये (कोठडीत) आरडाओरडा करत पोलिसांवर अरेरावी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याबाबतचीही स्वतंत्र नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

आनेवाडी टोलनाक्याच्या हस्तांतरणाच्या वादातून दि. 5 ऑक्टोबरच्या रात्री सुरुची बंगल्याबाहेर खा. उदयनराजे भोसले आणि आ.  शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोरच त्यांच्या समर्थकांची धुमश्‍चक्री झाली. दोन्ही राजे समर्थकांनी तोडफोड, जाळपोळ करत अज्ञाताने गोळीबारही केला. या राड्यावेळी भरधाव वेगात आलेल्या चारचाकीने ठोकरल्याने शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह दोन कर्मचारी जखमी झाले होते. या सर्व अभूतपूर्व राड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अ‍ॅड. विक्रम पवार यांनी खा. उदयनराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात तर अजिंक्य मोहिते याने आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात खुनाच्या प्रयत्नाची तक्रार दिली आहे.

राड्यावेळी जखमी झालेल्या पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रराजे यांच्यासह 200 जणांविरुध्द खुनाच्या प्रयत्नाची तक्रार दिली आहे. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन्ही गटातील संशयित पसार झाले होते. पसार असणार्‍यांमध्ये नगरसेवक बाळू खंदारे याचेही नाव होते. पसार असतानाच बाळू खंदारेविरुध्द शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारीचाही गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस पसार झालेल्या बाळू खंदारे याचा शोध घेत होते.

बाळू खंदारे याला गेल्याच महिन्यातसातारा शहर पोलिसांनी सावकारीच्या गुन्ह्यात अटक केले होते. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत गेलेल्या खंदारे याला सोमवारी सुरुची राड्याप्रकरणी अजिंक्य मोहिते याने दिलेल्या तक्रारीनुसार अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर खंदारेला 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस कोठडी मिळाल्याने त्याला सातारा शहर पोलीस ठाण्याजवळ असणार्‍या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास कोठडीत असणार्‍या खंदारे याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘मला आंघोळ करायची आहे, बाहेर काढा,’ असे जोरजोराने ओरडत चक्‍क पोलिसांवर अरेरावी करण्यास सुरुवात केली. पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे पाहून त्याने पुन्हा जोरजोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. कोठडीतील गोंधळाची माहिती पोलिस कर्मचार्‍यांनी तपासी अधिकारी व तालुका पोलिस ठाण्याचे पोनि प्रदीपकुमार जाधव यांना दिली. त्याची स्वतंत्र नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.